कारवार समुद्रात ट्रॉलरला आग, मच्छीमाराचा मृत्यू

0
1322
गोवा खबर:कारवारच्या नौदल तळापासून सुमारे तीन सागरी मैल अंतरावरील खोल समुद्रात मच्छीमारी ट्रॉलरला लागलेल्या भीषण आगीत एका मच्छीमाराचा भाजून मृत्यू आला तर अन्य एक  गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. भारतीय नौदलाने घटनास्थळी रवाना होऊन बचावकार्यात भाग घेतला.
कारवारच्या नौदल तळापासून तीन सागरी मैल अंतरावरील खोल समुद्रात कारवारचे काही मच्छीमार ट्रॉलरवरून मच्छीमारी करीत होते. या मच्छीमारी दरम्यान या ट्रॉलरवर आग लागण्याची घटना घडली. अन्न शिजवण्यासाठी या ट्रॉलरवरील मच्छीमारांनी केरोसिन वर चालणारा  स्टोव्ह चालू केला होता. या स्टोव्हचा  भडका उडून ट्रॉलरच्या इंजीन रूमने पेट घेतला. त्यात एका मच्छीमाराचा भाजून मृत्यू आला. तर अन्य एक मच्छीमार गंभीर जखमी झाला.ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडल्याचे  भारतीय नौदलाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या मच्छीमारी ट्रॉलरचे नाव ‘जलपद्मा’ असे आहे. भारतीय नौदलाने आगीवर नियंत्रण मिळवून मच्छिमारी ट्रॉलर व खलाशांना किनाऱ्यावर सुखरूप आणले.
मच्छीमार ट्रॉलरला आग लागल्याची माहिती मिळताच भारतीय नौदलाची अतिजलद नौका व एक टग मदत कार्यासाठी घटनास्थळी रवाना झाला. नौदलाच्या जवानांनी तासाभराच्या  प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. नौदलाच्या जहाजावरूनच अन्य मच्छीमारांना धक्क्यावर आणण्यात आले. या घटनेची नंतर स्थानिक पोलीसांना व मच्छीमार खात्याला नौदलाकडून माहिती देण्यात आली.