काबो राजनिवासाचे कॅसिनो, स्पा रिसोर्ट करण्याचा डाॅ. प्रमोद सावंताचा डाव : गिरीेश चोडणकर यांचा आरोप 

0
242

गोवा खबर: काबो राज निवासाचे खासगीकरण करुन तेथे कॅसिनो स्पा रिसोर्ट सुरु करण्याचा डाॅ. प्रमोद सावंतांचा डाव आहे. त्यामुळेच त्यानी  नविन राजभवन बांधण्याचा सरकारी प्रस्ताव पुढे केला आहे असा आरोप गोवा प्रदेश काॅंग्रेस समिती अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. 

कोविड संकट काळात केवळ आपली तिजोरी भरण्यावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे. राजभवनच्या वास्तुत कॅसिनो स्पा रिसोर्ट सुरू करुन ती  ऐतिहासिक वास्तु  खासगी कंपनीला विकण्याचा प्रस्ताव  प्रमोद सावंतानी तयार केला आहे, असा दावा चोडणकर यानी केला आहे.
कोळसा व खाण व्यवसायात त्यांचे थेट हितसबंध गुंतलेले असल्याने मोले अभयारण्यात लाखो झाडांची कत्तल करुन येणाऱ्या प्रकल्पांबद्दल  मुख्यमंत्री  काहिच बोलत नाहीत असा आरोप करून चोडणकर म्हणाले, रेल्वे रुळांचे दुपदरीकरण करुन आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी मुख्यमंत्री गोव्याचे पर्यावरण नष्ट करण्यास पुढे सरसावले आहेत हे दुर्देवी आहे.
गोवा विधानसभेच्या एक दिवसीय अधिवेशनात राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नाही हे मान्य करणारे मुख्यमंत्री करोडो रुपये खर्च करुन नविन प्रकल्प बांधण्याचे व काही प्रकल्पांचे नुतनिकरण करण्याच्या घोषणा करीत आहेत. केवळ सल्लागार व कंत्राटदारांकडुन कमिशन खाण्यासाठी गरज नसताना हे प्रकल्प राबवले जाणार आहेत,असा आरोप चोडणकर यांनी केला.
असंवेदनशील भाजप सरकारकडे दयानंद सामाजीक सुरक्षा योजना, विधवा व दिव्यांग यांचे मासीक पेंशन देण्यासाठी निधी नाही परंतु स्व. मनोहर पर्रिकरांचे स्मारक बांधण्यासाठी सरकार १५ कोटींचा चुराडा करीत आहे,याकडे चोडणकर यांनी लक्ष वेधले.