कापूस आणि सुताची राखी जीएसटीमुक्त

0
1172

राखीपौर्णिमेचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला असतानाच केंद्र सरकारने धातूपासून विशेषतः सोने आणि चांदीपासून तयार करण्यात आलेल्या राखीवर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र, कापूस अथवा सुतापासून तयार करण्यात आलेली राखी जीएसटीमुक्त ठेवण्यात आली आहे.

राखीपौर्णिमेच्या निमित्ताने दुकानदारांकडून जीएसटीच्या नावाखाली वाढीवर दराने राखीची विक्री करण्यात येत होती. त्यामुळे ग्राहकांनी ‘सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्स’कडे (सीबीईसी) तक्रारी नोंदवल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ‘सीबीईसी’तर्फे शुक्रवारी नव्या वस्तूंच्या दराविषयी स्पष्टीकरण देण्यात आले. चॉकलेटचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मिठाईवर २८ टक्के कर आकारण्यात येणार आहे. फरसाण, साधी कचोरी आदींवर १२ टक्के कर लावण्यात आला आहे. शिवाय ज्या मिठाईवर केशर अथवा चांदीचा वर्ख वापरण्यात येईल त्यावर १८ टक्के कर आकारण्यात येणार आहे. ‘संदेश’ या बंगालच्या प्रसिद्ध मिठाईवर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार असून, पचनशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त इसबगोलच्या बियांना मात्र जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे.

सौंदर्यप्रसाधनातील प्रमुख साधन असणाऱ्या नेलपॉलिशवर २८ टक्के कर आकारण्यात येणार आहे. लाखेपासून तयार करण्यात येणाऱ्या बांगड्यांवर तीन टक्के कर आकारण्यात येणार आहे. कुल्फी, इडली आणि डोशाचे तयार पिठावर १८ टक्के तर, ओल्या खजुरावर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. या शिवाय खव्यावर ५ टक्के आणि डॉगफूडवर १८ टक्के कर आकारण्यात येणार आहे. ताज्या किंवा ओल्या चिंचेला जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे, मात्र, वाळवलेल्या चिंचेवर १२ टक्के कर आकारण्यात येणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हेअर रबर बँडवर २८ टक्के करआकारणी करण्यात येणार आहे.