कान चित्रपट महोत्सवात ‘इफ्फीच्या सुवर्णमहोत्सवी विशेष पोस्टरचे होणार प्रकाशन

0
1078

 माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांच्याकडे भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व

गोवा खबर:येत्या 14 ते 25 मे 2019 दरम्यान, होणाऱ्या ‘कान चित्रपट’ महोत्सवात भारताच्या दालनाचे उद्‌घाटन होत आहे. या दालनात भारतीय चित्रपटांची भाषिक, विभागीय तसेच सांस्कृतिक विविधता दर्शवण्यात येणार आहे. या दालनात चित्रपट वितरण, निर्मिती,भारतातील चित्रीकरण, तंत्रज्ञान आदीं संदर्भात आंतरराष्ट्रीय भागीदारी विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. या दालनामुळे भारतीय प्रतिनिधींना आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसोबत संवाद साधणे शक्य होणार आहे.

या वर्षी माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. या शिष्टमंडळात सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी तसेच राहुल रवेल, शाजी एन. करुण आणि मधुर भांडारकर यांचा समावेश आहे.

गोव्यात या वर्षी होणाऱ्या सुवर्ण महोत्सवी इफ्फी चित्रपट महोत्सवाची जाहिरात करणे हा भारतीय शिष्टमंडळाचा मुख्य कार्यक्रम असेल. इफ्फीच्या विशेष पोस्टरचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.

भारतात उपलब्ध असलेले तंत्रज्ञ तसेच कुशल व्यावसायिक यांचा फायदा घेऊन भारत निर्मितीपश्चात हब असल्याचे प्रामुख्याने मांडण्यात येईल.

“स‍हनिर्मिती आणि एक खिडकी परवाना यासारख्या पुढाकारांमुळे भारतीय चित्रपट निर्माते आणि जगभरातील निर्मिती संस्था यांच्यात एकात्मिकता निर्माण व्हायला मदत होईल” असे अमित खरे यांनी सांगितले. यामुळे चित्रपटांसाठी नवीन बाजारपेठ आणि नवे प्रेक्षक निर्मित होतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.