काजू इंडिया २०१७ – ५व्या जागतिक काजू परिषदेचे १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान आयोजन

0
943

 

पणजी:भारतीय काजू निर्यात प्रोत्साहन समितीच्या (सीईपीसीआय) वतीने १७ ते १९ सप्टेंबर २०१७ दरम्यान गोव्यातील ग्रँड हयात-गोवा मध्ये काजू इंडिया २०१७ या पाचव्या जागतिक काजू परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतामध्ये काजूचा प्रवेश गोव्यातून झाला असल्याने काजूच्या इतिहासात गोव्याचे वेगळेच महत्त्व आहे. त्यामुळे गोव्यात प्रथमच ही परिषद होत असल्याने या परिषदेला एक वेगळा आयाम प्राप्त होणार आहे. काजू उद्योगाचे राष्ट्रीय महत्त्व पाहता तसेच देशातील इतर भागांतील घडामोडींची दखल घेण्याच्या उद्देशाने भविष्यात काजू उद्योगाबाबतचे उपक्रम देशातील प्रमुख काजू उत्पादक किंवा प्रक्रिया उद्योग असलेल्या राज्यांमध्ये घेणे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
काजू इंडिया २०१७ला आतापर्यंत भरघोस प्रतिसाद मिळाला असून देशभरातून ४००हून अधिक तसेच अमेरिका, युरोपीय देश, कॅनडा, जपान, संयुक्त अरब अमिरात व आफ्रिकी देशांतून २०हून अधिक विदेशी प्रतिनिधींनी या परिषदेत सहभागासाठी नोंदणी केलेली आहे.
काजू बिया तसेच काजूपासून बनणाऱ्या विविध उत्पादनांची निर्यात करणाऱ्या सर्वोत्तम निर्यातदारांच्या कामगिरीची दखल निर्यात प्रोत्साहन पुरस्कार व प्रमाणपत्राच्या माध्यमातून प्रथमच या परिषदेतून घेतली जाणार आहे. गोव्यातील अशा दोन प्रकल्पांना अशा प्रकारचे दोन पुरस्कार जाहीर झाले आहे. पुरस्कार श्रेणी व पुरस्कार प्राप्त संस्था यांची यादी सोबत जोडली आहे.
काजू क्षेत्रातील या नामवंत हस्तींचे जागतिक काजू उद्योग क्षेत्रातील योगदानाची दखल घेण्यासाठी सीईपीसीआयद्वारे पाच विदेशी आणि सहा भारतीय नागरिकांना काजू इंडिया २०१७ पुरस्कार देण्यात येणार आहे. काजू इंडिया २०१७ पुरस्कारमूर्तींमध्ये गोव्यातील एका नामांकित उद्योजकाचा समावेश आहे.
जागतिक पातळीवर आपली स्पर्धाक्षमता सुधारण्यासाठी तसेच काजू उद्योगातील आपला विकास शाश्वत करण्यासाठी आधुनुकीकरण आणि यांत्रिकीकरण या दोन बाबी आवश्यक ठरत आहेत. त्यामुळेच काजू इंडिया परिषदेमध्ये काजू उद्योगासाठी लागणाऱ्या यंत्रे, उपकरणांचे प्रदर्शनही भरवण्यात आले असून यामुळे या उद्योग क्षेत्रातील यांत्रिकी प्रक्रिया अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणे शक्य होणार असून त्याद्वारे भारतीय काजू उद्योगक्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे.
तसेच या क्षेत्रातील ज्ञानाचे आदानप्रदान करण्याबरोबरच पुढील पिढीमध्ये नावीन्यतेचा अवलंब करण्यासही प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने काजू इंडिया परिषदेमध्ये विविध चर्चासत्रांची आखणी करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर तसेच काजू क्षेत्रातील नव्या घडामोडींची दखल घेण्यासाठी भारताच्या, विशेषतः गोव्याच्या काजू उद्योगाच्या विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखण्यास गती देण्याचा प्रयत्न काजू इंडिया २०१७ परिषदेच्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीने होणार आहे. त्यांच्या हस्ते ग्रँड हयात-गोवामध्ये सायंकाळी ६ ते ७.३० याहस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. गोवा हे एक पारंपरिक गोवा उत्पादक राज्य असून राज्याच्या अर्थकारणातही काजू उद्योगाचे मोठे महत्त्व राहिले आहे. त्यामुळे या परिषदेला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती ही या उद्योगाच्या विकासाला गती देतानाच या उत्पादनाचे मूल्य वर्धन होण्यासही प्रोत्साहन मिळणार आहे.
देशामध्ये सर्वाधिक काजू प्रक्रिया आणि काजू निर्यात करणारे राज्य म्हणून केरळची ओळख आहे. त्यामुळे त्या राज्याच्या माननीय मत्स्योद्योग, बंदर अभियांत्रिकी आणि काजू उद्योगाच्या मंत्री श्रीमती जे. मर्सिकट्टी अम्मा यांनीही उपस्थित राहण्यास होकार दिला असून १७ सप्टेंबर २०१७ रोजी उद्घाटन कार्यक्रमात त्या प्रमुख भाषण करणार आहेत.
केरळमधील काजू उद्योगाचे महत्त्व ध्यानात घेऊन माननीय खासदार श्री. एन.के. प्रेमचंद्रन यांनीही १७ सप्टेंबर रोजीच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निश्चित केले असून या परिषदेत विदेशांतून आलेले प्रतिनिधी तसेच काजू उद्योग विकासाची जबाबदारी असलेल्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत.
काजू उत्पादनांच्या निर्यातीत आणि जागतिक काजू उद्योगक्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत पुरस्कार सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री माननीय श्री. सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत. यावेळी जागतिक काजू उद्योगक्षेत्रातील ज्येष्ठ प्रतिनिधींचाही सन्मान करण्यात येणार आहे.
कच्च्या काजूबियांचे सर्वाधिक उत्पादन घेण्यामध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून देशातून एकूण काजू उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा ३३% (२५७,००० मे. टन) आहे. महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन आणि गृह (ग्रामीण) या विभागांचे राज्यमंत्री श्री. दीपक वसंत केसरकर २०१६-१७ साठीच्या निर्यात प्रोत्साहन पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहणार असून या क्षेत्रातील प्रतिनिधींशी ते संवाद साधणार आहेत.
एकूणच काजू इंडिया २०१७च्या माध्यमातून काजू उद्योगातील प्रतिनिधी नव्याने सुसंवाद साधणार असून नव्या विश्र्वासाने दर्जेदार उत्पादने शाश्वत पद्धतीने उपलब्ध करत काजू निर्यात वाढीला चालना देण्याची प्रेरणा घेणार आहेत. भारतातील कच्च्या काजू बियांचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा असून आणि २०२५पर्यंत ते भारतीय काजू उद्योग क्षेत्राची मागणी असलेल्या २० लाख मे.टन आकड्यापर्यंत पोचवण्यासाठी सीईपीसीआयने भारत सरकारच्या सहकार्याने एक कृती आराखडा तयार केला आहे.