कांदोळी खून प्रकरणाचा 12 तासांच्या आत छडा;2 संशयितांना कर्नाटकमधून अटक

0
1019
गोवा खबर:भल्या पहाटे कांदोळी येथे हॉटेल व्यावसायिक विश्वजीत सिंह यांचा खून करून गदग-कर्नाटक येथे पसार झालेल्या दोघा संशयितांच्या मुसक्या 12 तासाच्या आत आवळण्याची किमया गोवा पोलिसांनी करून दाखवली आहे.
बामनवाडो-कांदोळी येथील सन अॅण्ड सँडच्या पार्किंगच्या जागेत आज भल्या पहाटे दोन तरुणांनी तलवार आणि चाकूने वार करून मूळ दिल्ली येथील आणि गोव्यात हॉटेल व्यवसाय करणाऱ्या विश्वजीत सिंह यांची हत्या केली होती.चाकू आणि तलवारीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सिंह यांना उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरनी त्यांना मृत म्हणून घोषित केले.
vishvjeet singh
कांदोळीत खून झाल्याची माहिती मिळताच उत्तर गोवा पोलिस अधीक्षक चंदन चौधरी,उपविभागीय पोलिस अधिकारी सेराफिन डायस आणि कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास कार्याला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळावरुन पुरावे गोळा करून संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांपैकी एकजण नेरुल येथे राहणारा उमेश राठोड असल्याचे स्पष्ट झाले.दुसऱ्या हल्लेखोराची मात्र ओळख पटू शकली नाही.पोलिसांनी राठोडची माहिती काढली तेव्हा तो मुळचा गदग-कर्नाटक येथील असून 3 वर्षां पासून सिंह यांच्या साठी काम करत असल्याचे आढळून आले.
प्रत्यक्ष साक्षीदार आणि तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे राठोड हा गदग परिसरात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली.
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक चौधरी यांनी लागलीच गदगचे पोलिस अधीक्षक संतोष बानू यांच्याशी संपर्क साधुन त्यांना राठोड आणि त्याचा साथीदार दयाशंकरची माहिती दिली.गोवा पोलिसांच्या माहितीच्या आधारे गदग पोलिसांनी उमेश आणि दयाशंकरच्या मुसक्या आवळल्या. दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक गदग येथे रवाना झाले आहे.
या खुनाचा तपास उत्तर गोवा पोलिस अधीक्षक चंदन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली म्हापसाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सेराफिन डायस,पोलिस निरीक्षक जीवबा दळवी,सी.एल. पाटील, तुषार लोटलीकर यांनी यशस्वी पणे करत 12 तासांच्या आत छडा लावला.उमेशने सिंह यांची दुचाकी न विचारता नेली होती.ती आणून न दिल्याने सिंह यांनी उमेश विरोधात कळंगुट पोलिसात एफआयआर नोंदवली होती.त्यानंतर दोघां मध्ये बिनसलेल्या संबंधाचे पर्यावसान खुनात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.पोलिस निरीक्षक दळवी पुढील तपास करत आहेत.