काँग्रेस गुन्हेगारांना पाठीशी घालते : शिवसेनेचा आरोप

0
1008
गोवा खबर : दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून ज्या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई होत आहे अशांना काँग्रेस पक्ष पाठीशी घालत आहे, असा आरोप गोवा शिवसेनेच्या उपाध्यक्ष राखी प्रभुदेसाई नाईक यांनी केला आहे.
    राखी नाईक या मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या राजकीय अनुयायी आहेत, या काँग्रेसच्या आरोपाला त्यांनी आज प्रत्युत्तर देताना काँग्रेस गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. काँग्रेसने बुधवारी पत्रकार परिषदेस नेत्रावळीचे उपसरपंच अभिजीत देसाई यांची उपस्थिती व त्यांनी केलेल्या आरोपा बाबत बोलताना त्या म्हणाल्या, यासारख्या प्रकारांमुळे काँग्रेसच्या दुटप्पीपणाचे पितळ उघडे पडले आहे.

  नाईक म्हणाल्या, राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. एकीकडे काँग्रेस याबद्दल सरकारवर टिका करते तर दुसरीकडे ज्याच्यावर सांगे पोलिस स्थानकात बरेच गुन्हे दाखल झालेले आहेत अशा व्यक्तीला महत्त्व देते. राज्यात कोणत्याही प्रकारचे अराजक चालू न देणारे स्पष्टवक्ते व सन्माननीय राजकारणी प्रतापसिंह राणे यांच्यासमवेत अभिजीत देसाई यांना व्यासपीठावर पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला.

      पर्रिकर यांच्याशी साटेलोटे असल्याचा आरोप पूर्ण फेटाळून लावताना त्या म्हणाल्या,  उलट अनेक प्रसंगी राज्य सरकारविरुद्ध बोलण्यात मी आघाडीवर असते. इतकेच नाही तर मनोहर पर्रिकर यांच्याविरुद्धही मी निवेदने केलेली आहेत.
      पोलिस कोठडीतील हल्ला, सरकारी कर्मचाऱ्यावरील हल्ला, बदनामी, मर्यादशीलता सोडून वागणे, पॉक्सो, ग्रामपंचायतीत अपहार आदी गुन्ह्यांबद्दल ज्या अभिजीत देसाई यांची पोलिस चौकशी सुरू आहे, त्यांना पाठीशी घालत असल्याबद्दल काँग्रेसने खरे तर सांगेच्या नागरिकांची माफी मागितली पाहिजे, अशी नाईक यांनी मागणी केली आहे. या व्यतिरिक्त दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून देसाई यांच्यावर तडीपारीची कारवाई होत आहे. तसेच नेत्रावळी गावात प्रवेश करणाऱ्या लोकांकडून बनावट पावत्यांद्वारे पथकर वसूल केल्याचे त्यांनी मान्य केले असल्याने त्यांना अपात्र ठरवले जाण्याची कारवाई होण्याचीही शक्यता असल्याचे नाईक यांनी निदर्शनास आणून दिले.
    अभिजीत देसाई यांनी केलेले गैरप्रकार चोडणकर यांनी त्या संबंधीच्या फायली आधी  नजरेखालून घालून पाहून घ्यावेत, तसेच त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारी पाहाव्यात आणि  मगच निष्कर्ष काढावा. शिवाय मी पर्रिकर यांच्याशी संधान साधुन आहे, हेही सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान राखी नाईक यांनी त्यांना दिले आहे.
 काँग्रेस तसे करू शकली नाही तर एका विनयभंगाच्या प्रकरणात अडकलेल्या त्यांच्या नेत्यांना संरक्षण देण्यासाठी पक्षाने अत्यंत खालची पातळी गाठली असल्याचे मान्य करावे,असे सांगून नाईक म्हणाल्या,  गोवा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो आणि दक्षिण गोव्यातील नेत्या सावित्री कवळेकर या दोघी देसाई यांच्यासह ‘पॉक्सो’ कायद्यान्वये आरोपी आहेत.
 गुन्हेगाराला अभय देत असल्याबद्दल गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण काँग्रेस पक्षाने सांगेच्या रहिवाशांची माफी मागावी, अशी शिवसेनेची मागणी आहे, असे राखी नाईक यांनी ठामपणे म्हटले आहे.