काँग्रेस आमदार फुटणार कवळेकर यांनी पूर्वीच सांगितले होते;सरदेसाई यांचा गोप्यस्फोट

0
1294
गोवा खबर:काँग्रेसचे आमदार फुटणार हे आपल्याला भाजपकडून नव्हे तर खुद्द काँग्रेसचे आमदार बाबू कवळेकर यांच्याकडून समजले होते, असा गौप्यस्फोट गोवा फॉरवर्डचे नेते तथा उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी केला आहे.
राज्यात सरकार स्थिर आहे. कोसळण्याची कोणतीही शक्यता नाही अशा स्थितीत भाजपने तडकाफडकी काँग्रेसचे दहा आमदार फोडून का आणले ? हे आपल्याला समजलेले नाही अशा शब्दात  सरदेसाई यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
सरकार पडण्यासाठी गोवा फॉरवर्डने कोणतीच कृती केली नाही. आजही आम्ही भाजपबरोबर आहोत, पण असे काही घडणार हे आपल्याला बऱ्याच दिवसापासून माहिती होते, असेही सरदेसाई म्हणाले.
सरदेसाई म्हणाले, बाबू कवळेकर यांनी दोन महिन्यांपूर्वी आपल्याला या बद्दल सुचित केले होते. गोवा फॉरवर्डने काँग्रेसबरोबर यावे अन्यथा एक दिवस आम्ही भाजप सोबत जाऊ आणि तुम्ही बाहेर पडाल, असा इशारा त्यांनी दिला होता.
 बाबुश मोन्सेरात यांनी तर अडीच वर्षांपूर्वीच यासंदर्भात आपल्याला सूचित केले होते असे ते म्हणाले.
या दहा आमदारांना भाजपात आणण्याचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री मनोहत पर्रिकर हयात असताना आला होता. आपण पर्रीकर यांच्यांशी याबाबत चर्चाही केली होती. गोवा फॉरवर्ड पक्ष खरेदी-विक्रीच्या व्यवसायात उतरलेला नाही. आम्ही रात्रीच्या अंधारात दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचे काम करत नाही. गोवा फॉरवर्ड पक्षाला स्वतःचे असे धोरण असून आम्ही त्या धोरणावर कायम असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.