काँग्रेस आमदारांना एकसंध ठेवण्याचे आव्हान चोडणकर पेलतील का?

0
1949
गोवाखबर:2017 च्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक 17 आमदार निवडून येऊन देखील आमदारां मधील नेतृत्वा वरुन न झालेल्या एकमतामुळे विरोधात बसण्याची नामुश्कि ओढवून घ्यावी लागलेल्या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करताना उरलेल्या 16 आमदारांना एकत्र ठेवण्यात नूतन अध्यक्ष गिरीश चोडणकर यशस्वी ठरले तरच काँग्रेसला भविष्यात अच्छे दिन अनुभवता येऊ शकतील.
राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी तरुणांना प्रोत्साहन देण्याची भूमिका जाहीर केल्या नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर असलेल्या शांताराम नाईक आपल्या पदाचा राजीनामा सोपवून तरुण नेतृत्वासाठी प्रदेशाध्यक्ष पदाची जागा रिक्त केली होती.त्यानंतर युवा नेते गिरीश चोडणकर यांची या पदावर नियुक्ति झाली असून आज ते आपल्या पदाचा भार घेणार आहेत.काँग्रेसचे बडे नेते आज उपस्थित राहणार असून चोडणकर राज्यात भासत असलेल्या आक्रमक विरोधी पक्षाची उणीव भरून काढतात की शांताराम नाईक यांच्या पावलांवर पाउल ठेवत शांत पणे आपला कार्यकाळ पूर्ण करतात हेच महत्वपूर्ण ठरणार आहे.
विश्वजीत राणे यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतल्या नंतर उरलेल्या 16 आमदारांना एकसंध ठेवण्याचे आव्हान चोडणकर यांना पेलावे लागणार आहे.
काँग्रेसच्या 16 आमदारांमध्ये ऑल इज नॉट वेल अशी परिस्थिती आहे.राष्ट्रपती निवडणूकीवेळी काँग्रेसने जागता पहरा ठेवून देखील त्यांची 5 मते फुटली होती.हे 5 आमदार कोण?त्यांचा कल भाजपा कडे का याची उत्तरे अजुन स्पष्ट झालेली नाही.त्या 5 आमदारांवर त्यासाठी कोणतीही कारवाई करण्याचे साधे धाडस काँग्रेस नेतृत्वाला झालेले नाही.चोडणकर  या काठावर असलेल्या आमदारांना भाजप आघाडी सरकार विरोधात दंड थोपटून उभे राहण्याचे बळ निर्माण करतील का?
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे याचे पिताश्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे भाजप आघाडी सरकारला त्यांनी दिलेली आश्वासने पुर्ण करण्यास वेळ द्या अशी विनवणी जाहीर कार्यक्रमांमधून करतात.याचा अर्थ नेमका काय याचा शोध चोडणकर यांना घ्यावा लागणार आहे.
प्रतापसिंह राणे विरोधी पक्षनेते असताना देखील अशीच मळमळीत भाषा करत होते.सरकारला 100 दिवस काम करु द्या, मग काय ते बोलू अशी त्यांची भूमिका होती.आज त्यात फारसा फरक पडला असे त्यांच्या जाहीर विधानांवरुन वाटत नाही.खरे तर राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्यापूर्वी काँग्रेसच्या नव्या दमाच्या तरुणांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे काम करणे अपेक्षित आहे.प्रत्यक्षात मात्र तशी कोणतीच चिन्ह दिसली नाहीत.ही दुर्दैवी बाब आहे.
सरकार स्थापनेत अपयश आल्याचा ठपका आल्याने पद सोडावे लागल्यामुळे काँग्रेसचे आणखी एक वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री लूईझीन फालेरो नाराज झाले आहे.प्रदेशाध्यक्ष पद गेल्या नंतर त्यांची बोलती बंद झाली आहे.फालेरो सरकार विरोधातील मुद्दे आक्रमकपणे मांडत असत पण पद गेल्या पासून ते नैराश्येच्या र्गतेत तर सापडले नाही ना अशी शंका येण्या इतपत परिस्थिती सध्या आहे.चोडणकर त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणू शकतील का?
विरोधी पक्षनेतेपद सांभाळणाऱ्या बाबू कवळेकर यांना बेहिशोबी मालमत्ता,मटका सारख्या प्रकरणांमुळे सरकारने जखडून ठेवले आहे.त्यामुळे कवळेकर यांच्या विरोधाची धार बोथट झाली आहे.कवळेकर देखील आता सल्ल्याच्या भाषेत बोलू लागले आहेत.त्यांना आक्रमक करून सरकारच्या अपयशाची लक्तरे वेषीवर टांगण्याची जबाबदारी चोडणकर पेलतील का?
2012 पासून गाजत असलेल्या खाण घोटाळ्यात नाव असलेले माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मुळे काँग्रेस पक्ष अडीचणीत सापडला आहे.कामत आपला बचाव वैयक्तिक पातळीवर आक्रकम आणि उत्तम पद्धतीने करतात मात्र तीच एनर्जी ते पक्षासाठी वापरताना दिसत नाहीत.विधानसभेत कामत आणि आलेक्स रेजिनाल्ड यांचे अस्तित्व जाणवते.दोघेही आक्रमक होऊन हल्ला करतात मात्र बाकीचे त्यात कमी पडतात.
राज्यात प्रादेशिक आराखडा,पीडीए,कॅसिनो,
बेरोजगारी,खाणी बंद पडल्याने निर्माण झालेले आर्थिक संकट,बिघडत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था असे कितीतरी प्रश्न सरकारच्या नाकात दम आणत असले तरी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून त्याचा फायदा उठावण्यात काँग्रेसला अजीबात जमलेले नाही.चोडणकर यांना हे साध्य करून दाखवावे लागेल.
मुख्यमंत्री विरहीत सरकारवरुन चोडणकर यांनी रस्त्यावरची लढाई लढण्याची भाषा बोलून दाखवली आहे.त्यांचे हे आंदोलन सरकार विरोधात लोकांच्या मनात खदखदत असंतोषाला ठीणगी देऊ शकणार का याचे उत्तर भविष्यात मिळणार आहे.