गोवाखबर:अखिल भारतीय काँग्रेस समितीने धार्मिक सलोख्याला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात आयोजित केलेल्या उपोषणाचा कार्यक्रम गोव्यात पार पडला खरा पण 9 काँग्रेस आमदारांच्या मात्र तो पचनी पडला नाही.16 पैकी 7 आमदार फक्त आज पणजी येथील आझाद मैदानावर पार पडलेल्या उपोषण कार्यक्रमास हजर होते.राष्ट्रीय कार्यक्रम असून देखील 9 आमदारांनी त्याकडे पाठ फिरवल्याने दिवसभर तोच चर्चेचा विषय बनला होता.
2017 च्या निवडणुका झाल्यानंतर 17 आमदार निवडून येऊन देखील काँग्रेसला सत्तेची खुर्ची मिळवता आली नव्हती.काँग्रेस आमदारांमध्ये एकमत होत नसल्याने काँग्रेसला हाता तोंडाशी आलेली सत्ता गमवावी लागली होती.मध्यंतरी राष्ट्रपती निवडणुकीवेळी देखील काँग्रेसची 5 मते फुटली होती.
काँग्रेस आमदार एकत्र येऊन विरोधकाची भूमिका बजावत नसल्याने ताळमेळ नसताना देखील भाजप आघाडी सरकारला सत्ता टिकवून ठेवणे शक्य होत आहे.आज राष्ट्रीय विषयावर पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी महत्वाचा कार्यक्रम आयोजित करून देखील त्यात सहभागी व्हावे असे गोव्यातील 9 आमदारांना वाटले नाही.
विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर,लुईझीन फालेरो,जेनिफर मोन्सेरात,इजिदोर फर्नांडिस,फिलिफ नेरी रोड्रिग्स,विल्फ्रेड डिसा आणि क्लियोफास डायस वगळता बाकी आमदारांनी घरी बसून राहणे पसंत केले. प्रदेशाध्यश पदाच्या शर्यतीमध्ये असलेले दिंगबर कामत देखील उपोषणाकडे फिरकले नाहीत.
प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक, महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो,फ्रांसिस्को सार्दिन, सावित्री कवळेकर,अल्तीन गोम्स,शंभु बांदेकर,आग्नेलो फर्नांडिस,जनार्दन भांडरी आदी प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.
उपोषण 11 ते 5 असे होते मात्र काँग्रेसच्या मंडळींनी 11 वाजता मंडप घालायला सुरुवात केली.साडे बारा वाजता पत्रकार परिषद वजा भाषणे झाली त्यात बहुतेकांनी भाजप देशात जातीय आणि धार्मिक तेढ माजवू पाहत असून त्यांचा हा डाव उधळून लावण्याचे आवाहन केले.5 वाजता उपोषणाची सांगता झाली.काँग्रेस कार्यकर्त्यां पेक्षा जास्त पोलिस आझाद मैदान परिसरात तैनात करण्यात आले होते.