काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या वाटेवर?

0
2228
 गोवा खबर:केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यामुळे गोव्यातील भाजप आघाडी सरकार अधिक भक्कम झाले आहे.त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी काँग्रेस आमदार भाजपवासी होण्यास तयार झाले आहेत.  
 काँगेसचे काही आमदार भाजप मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा गोव्यात गेले कित्येक दिवस सुरु आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी यापूर्वी अनेकदा काँग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केलेला आहे. त्याला काँग्रेसचे कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार क्लाफासियो डायस यांनी काँग्रेसचे चार आमदार भाजप मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे सांगून पुष्टी दिली आहे.आपण विरोधी पक्षात असल्याने कुंकळ्ळीच्या बेरोजगारांना सरकारी नोकऱ्या पुरवू शकत नाही. त्यामुळे आपल्या समर्थकांनी पाठिंबा दिल्यास आपण सुद्धा भाजपात प्रवेश करण्यास तयार आहे, असे  आमदार डायस यांनी सांगून खळबळ उडवून दिली आहे.
यापूर्वी काँग्रेसचे काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती.त्याची कुणकुण लागल्या नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांना आपल्या सोबत निवडणूक प्रचारात उतरवून ऑल इज वेल आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला होता.आता क्लाफासियो डायस देखील आपल्या सोबत असल्याचे दाखवण्याचे प्रयत्न चोडणकर करत आहेत.
 कुंकळ्ळी येथे काल सायंकाळी उशिरा डायस यांनी आपल्या समर्थकांची बैठक बोलावली होती.या सभेत त्यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे सहकारी उपस्थित होते.काँग्रेसचे चार आमदार त्यांच्या मतदारसंघात होत नसलेल्या विकास कामांमुळे अस्वस्थ आहेत.मतदारसंघाच्या विकासासाठी हे आमदार  भाजप मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, असे डायस आपल्या समर्थकांना सांगितले.आपल्या समर्थकांना आपण काँग्रेस पक्ष सोडलेला नको असल्यास आपण त्यांच्या मर्जीबाहेर जाणार नाही असे डायस स्पष्ट केले आहे.सुमारे २०० कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.बैठकी दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी डायस यांनी भाजपात प्रवेश करू नये, असे मत व्यक्त केले.तर काहींनी विकासासाठी हा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कुंकळ्ळी मतदारसंघात सध्या आपण काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणार अशा अफवा उठलेल्या आहेत. अजुन तरी आपल्याला भाजपची ऑफर आलेली नाही.पण विरोधात असल्याने आपणाला बेरोजगार युवकांना सरकारी नोकऱ्या मिळवुन देणे शक्य नाही.आमचे चार आमदार काँग्रेसचा त्याग करण्याच्या वाटे वर आहेत. आपल्याला लोकांनी परवानगी दिल्यास आपण त्यांच्या बारोबर काँग्रेस सोडण्यास तयार आहे, असे डायस म्हणाले.पत्रकारांनी डायस याना विचारले असता भाजप मध्ये प्रवेश करण्याबाबत त्यांनी तयारी दर्शवली आहे. यावर निर्णय घेण्यासाठी पुन्हा एकदा समर्थकांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चोडणकर प्रदेशाध्यक्ष झाल्या नंतर दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हाती घेतले होते.त्यापूर्वी काँग्रेस नेतृत्वाला कंटाळून विश्वजीत राणे यांनी देखील काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे भक्कम सरकार आल्याने राज्यात सत्तापालट होण्याची सुताराम शक्यता नाही.काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ देखील नाही.मगोच्या सुदिन ढवळीकर यांनी भाजप सोबत घटस्फोट घेतल्या नंतर काँग्रेसचा हात हाती घेतला आहे.मात्र गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई गोवा फॉरवर्डच्या तीन आणि अपक्ष 3 आमदारांना घेऊन भाजप सोबत असल्याने कितीही उठाठेवी केल्या तरी काँग्रेसला आवश्यक संख्याबळ गाठाता येणार नाही.त्यामुळे काँग्रेस सोबत राहून मतदारसंघ मागस ठेवण्यापेक्षा भाजप सोबत जाऊन मतदारसंघाचा विकास करून आपली पुढची वाटचाल सुखकर बनवलेली बरे असे वाटत असल्याने काँग्रेस आमदार भाजपशी सलगी वाढवू लागले असल्याचे मानले जात आहे.