काँग्रेसचे आणखी दोन आमदार भाजपच्या संपर्कात:तेंडुलकर

0
650
गोवा खबर:काँग्रेसचे आणखी दोन आमदार भाजपच्या संपर्कात आहेत.गरज पडेल तेव्हा ते आमच्या बाजूने मतदान करतील आणि साथ देतील.निवडणुकांचा निकाल लागल्या नंतर आमच्या आघाडीचे संख्याबळ 28 पर्यंत जाईल,असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी केला आहे.
आयटी प्रकल्पाला विरोध करताना काँग्रेसचे सध्याचे उमेदवार बाबुश मोन्सेरात यांनी ताळगाव मध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली होती.त्यावेळी विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बाबुश मोन्सेरात यांना काँग्रेस मध्ये घेणार नाही,आणि ते काँग्रेसमध्ये आले तर आपण  काँग्रेसचा त्याग करणार, असे  जाहिर केले होते.आता त्याच चोडणकर यांच्यावर मोन्सेरात यांना बी फॉर्म देण्याची नामुश्कि आली आहे.त्यामुळे चोडणकर यांनी राजीनामा देऊन आपला शब्द खरा करावा,अशी मागणी देखील  तेंडुलकर यांनी केली आहे.
भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तेंडुलकर यांनी चोडणकर यांना आयटी हब वरुन युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोन्सेरात यांच्या समर्थकांनी केलेल्या अमानुष मारहाणीची आठवण करून दिली.
चोडणकर यांनी हिम्मत असेल तर मोन्सेरात यांच्या समर्थकांकडून  मार खालेल्या अश्विन खलप,सुनील कवठणकर आणि संकल्प आमोणकर यांना मोन्सेरात यांच्या प्रचारासाठी आणून दाखवावे,असे आव्हान तेंडुलकर यांनी चोडणकर यांना दिले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चोडणकर हे 23 मे नंतर काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणार अशी मूंगेरीलाल के हसीन सपने पाहत असले तरी त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही,असे सांगून तेंडुलकर म्हणाले,दोन लोकसभा आणि चारही विधानसभा पोटनिवडणुका भाजप जिंकणार याबाबत कोणाचेच दुमत नाही.
पणजीत भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या प्रचाराच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या असून त्यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे,असे सांगून तेंडुलकर म्हणाले,पणजीवासिय नेहमीप्रमाणे भाजपला साथ देतील आणि मोन्सेरात यांना दूर ठेवतील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
तेंडुलकर म्हणाले,काँग्रेसकडून निवडणुकी नंतर भाजप सरकार कोसळणार अशा वावडया उठवल्या जात आहेत.मात्र त्यात अजिबात तथ्य नाही.23 मे रोजी निकाल लागल्या नंतर भाजप आमदारांची संख्या 18 होणार आहे.आमच्या सोबत आघाडीचे 6 आमदार आहेत.ते पकड़ून आमचे संख्याबळ 24 होणार आहे.शिवाय विरोधकां मधील 2 आमदार आम्हाला साथ देणार आहेत.त्यानंतर आमचे संख्याबळ 28 पर्यंत जाणार आहे.
सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी दिल्यामुळे उत्पल पर्रिकर समर्थक नाराज असून ते इतर पक्षांना साथ देत असल्याचा प्रचार विरोधकांकडून केला जात असला तरी त्यात अजिबात तथ्य नाही,असे सांगून तेंडुलकर म्हणाले, केंद्रीय समितीने सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.तो पक्षात सगळ्यांना मान्य आहे.विरोधक विनाकारण आमच्यात दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत.आमच्यात कोणतेच मतभेद नसून सगळे कार्यकर्ते एकत्र असून आमच्या सोबत आहेत.
मांडवी मधील कॅसिनोंना काँग्रेस सरकार असताना परवानगी देण्यात आलेली आहे.मोन्सेरात देखील त्यावेळी काँग्रेस मध्ये होते.त्यांना विरोध करायचा होता तर त्यावेळी का नाही विरोध केला,असा प्रश्न उपस्थित करून तेंडुलकर म्हणाले,सरकारने हे कॅसिनो स्थलातरीत करण्याचे ठरवले असून त्याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल.