काँग्रेसची उमेदवारी जाहीर; उत्तरेतून चोडणकर तर दक्षिणेतून सार्दिन

0
798
गोवा खबर: कॉँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी  उत्तर गोव्यातून विद्यमान प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर तर दक्षिण गोव्यातून माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
चोडणकर हे काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष असून २0१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पणजी मतदारसंघातून दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या विरोधात लढत दिली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांना उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांचा सामना करावा लागणार आहे.

फ्रान्सिस सार्दिन  हे माजी खासदार असून याआधी ते दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यांच्याजागी आलेक्स रेजिनाल्ड  यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता.
सार्दिन यांनी १९९९ साली काँग्रेस पक्ष  फोडून गोवा पीपल्स काँग्रेस स्थापन केली होती.त्यानंतर ते भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनले होते. १४ व्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत ते विजयी ठरले आणि १५ व्या लोकसभेवरही दक्षिण गोव्यातून निवडून आले होते.
दक्षिण गोव्यातून काँग्रेसच्या महिला आघाडी प्रमुख प्रतिमा कुतींन्हो उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करत होत्या.सार्दिन आणि कुतींन्हो यांची नावे दक्षिण गोव्यासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आली होती.शेवटी सार्दिन यांनी बाजी मारली.कुतींन्हो गेले दीड वर्षे विविध विषय घेऊन लढत होत्या.काँग्रेसची उमेदवारी आपल्याला मिळेल अशी त्यांना खात्री होती मात्र सार्दिन यांचे पारडे अखेर जड ठरले.