‘काँक्रीट टेक्नोलॉजी’ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

0
181

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांतिनेज येथील हॉटेल ताज विवांतामध्ये अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या ‘काँक्रीट टेक्नोलॉजी’ नामक पुस्तकाचे विमोचन केले. हा कार्यक्रम इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ काँक्रीटच्या गोवा केंद्राने आयोजित केला होता. डॉ. नारायण नाईक, डॉ. गुप्ता आणि डॉ. पुर्णानंद सावईकर यांनी संयुक्तरित्या हे पुस्तक लिहिले आहे.

पर्यावरणाचा नाश न करता आणि त्याचे संवर्धन करून सर्वागिण विकास घडविण्याचे सरकारचे ध्येय आहे. राज्याच्या भविष्यातील गरजा ओळखून सरकारद्वारे साधन सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे असे सांगून साधन सुविधा निर्मितीत योग्य पावले उचलण्यासाठी आपल्या नैपुण्याचा योग्य वापर करावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी अभियंत्यांना केले.

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाला अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. आम्ही गोव्याच्या स्वातंत्र्याची ६० वर्षे साजरी करीत आहोत. गोव्याला स्वयंपूर्ण बनविण्याची उद्दीष्ट्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचविण्यासाठी आम्ही हातात हात घालून काम करूया असेही त्यांनी सांगितले.

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाने तयार केलेले हे पुस्तक संपूर्ण भारतभर पोहोचविण्यात येणार आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगून, भावी अभियंत्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल असा विश्वास गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. लोहरा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाने तयार केलेले हे पहिले पुस्तक महाविद्यालयाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरणार आहे असे उद्गार डॉ. गुप्ता यांनी यावेळी काढले. इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ काँक्रिटचे अध्यक्ष डॉ. जोझेफ सिल्वेरा यांनी आयआयसी गोवा केंद्राच्या भुमिकेविषयी उपस्थितांना माहिती दिली.

त्यापुर्वी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांच्यासोबत मोपा विमानतळाच्या पिडीत लोकांची भेट घेऊन सदर प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीविषयी चर्चा केली. जमिनी आणि झाडे वाचविण्यासाठी रस्त्याचा मार्ग बदलण्यात येईल असे आश्वासन देऊन सर्वेक्षण करण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे. त्याचबरोबर जमिनी आणि झाडे वाचविण्याविषयीच्या लोकांच्या सूचनांचा विचार करण्यात येईल असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.