कळंगुट मध्ये 11 लाखांच्या ड्रग्ससह नायजेरीयनास अटक

0
902
गोवा खबर: पर्यटन आणि शिक्षणाच्या नावाखाली येऊन गोव्यात ड्रग्स व्यवसाय करणारे नायजेरियन नागरिक स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत.कळंगुट भागात ड्रग्सचा मोठा व्यवसाय करणाऱ्या नायजेरियन नागरिकाच्या मुसक्या कळंगुट पोलिसांनी आवळण्यात यश मिळवले असून त्याच्या कडून तब्बल 11 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहे.
परबावाडा-कळंगूट येथे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घातलेल्या छाप्यात एका नायजेरियनकडून 11 लाखांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. कळंगूट पोलिसांनी यंदाच्या वर्षी केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
अटक करण्यात आलेल्या नायजेरियन नागरिकाचे नाव प्रँक नाथा निल (32) असे असून तो कळंगूट येथे राहात होता. त्याच्याकडून एमडीएमए (78 हजार), मॉर्फिन (40 हजार), एम्पेन गोळया (72 हजार), गांजा (46 हजार) असे 11 लाख 5 हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
तो (जीए 03 एजे 0845) या पॅशन स्कूटरमधून अमली पदार्थांची वाहतूक करत असे. ती स्कूटर स्थानिकाची असून त्याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांनी ती स्कूटर जप्त केली आहे.
पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जतीन पोतदार, महेश नाईक, सिताराम मळीक, प्रजीत मांद्रेकर, शिपाई श्रयेश साखळकर, पांडुरंग सामंत, लक्ष्मण पटेकर यांनी ही कारवाई केली. अधीक्षक चंदन चौधरी व उपअधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी निरीक्षक दळवी यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, हा संशयित कळंगुटमध्ये अमलीपदार्थ तयार करत होता, अशी माहिती मिळाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. यात काही स्थानिक गुंतले असल्याची माहिती आहे.अलिकडच्या काही वर्षां मध्ये अमली पदार्थांच्या व्यवहारात गुंतलेल्या अनेक नायजेरियन नागरिकांना अटक करून त्यांच्या कडून लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असले तरी देखील नायजेरियन नागरिक हे गैरधंदे सोडत नसल्याचे दिसून आले आहे.