कळंगुट पोलिस ठरत आहेत ड्रग्स पेडलर्ससाठी कर्दनकाळ

0
983
 गोवा खबर:कळंगुट पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षक पदावर रुजू झाल्या पासून जीवबा दळवी आणि त्यांची टीम ड्रग्स पेडलर्ससाठी कर्दनकळ ठरू लागली आहे.ड्रग्स विरोधातील मोहीम सुरुच ठेवत कळंगुट पोलिसांनी वर्षभरात चांगली कामगिरी करून दाखवली आहे.  मंगळवारी पहाटे पोलिसांनी मूळ हिमाचल प्रदेशचा नागरिक असलेल्या एका तरुणा कडून २ लाख रूपये किंमतीचे ड्रग्स जप्त केले.
पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार गावरावाडा – कळंगुट येथील एका रेस्टॉरेंट मध्ये स्वयंपाकी म्हणून कामाला असलेला तरुण सुनिल कुमार (वय २२) हा ड्रग्सची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती  प्राप्त झाली होती,त्यानंतर लागलीच त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक स्थापन करुन सापळा रचण्यात आला.  रचलेल्या सापळ्यात तो अलगद अडकला. मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली व त्याला चरस व गांजा सह ताब्यात घेण्यात आले.
कारवाईवेळी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ  १ लाख ४० हजार रुपये किमतीचा चरस व ५५ हजार रुपये किमतीचा गांजा सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत १ लाख ९५ हजार रुपयांची आहे. ग्राहकाच्या प्रतिक्षेत असताना ही कारवाई करण्यात आल्याचे आली.
त्याला अटक करुन त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करुन त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली. निरिक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक आर पाटिल, उपनिरिक्षक सिताराम मळीक, कॉन्स्टेबल प्रवीण महाले, दिनेश मोरजकर, गोविंद शिरोडकर, वल्लभ पेडणेकर या पोलीस पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
 कळंगुट पोलिसांनी नविन वर्षात अमली पदार्था विरोधात केलेली ही पहिलीच कारवाई आहे. मागील वर्षभरात एकूण ३१ गुन्हे पोलिसांनी नोंद केले होते. सध्या सुरू असलेली ही मोहिम पुढे आणखी कडक करण्यात येणार असल्याचे  दळवी यांनी स्पष्ट केले.
 कळंगुट परिसरात गेल्या वर्षभरात ड्रग्सचे 31 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. एकूण ३२ जणांना अटक करुन त्यांच्याकडून ३० लाख रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. त्यापूर्वीच्या तीन वर्षाच्या तुलनेत दुप्पट कामगिरी पोलिसांनी एकाच वर्षात करून दाखवली  आहे. कळंगुट पोलिसांनी २०१४ ते २०१६ या तीन वर्षांच्या कालावधीत ड्रग्स विरोधात फक्त १६ गुन्हे नोंद केले होते. मात्र  २०१७ च्या वर्षात एकूण ३१ जणांवर गुन्हे नोंद करुन तीन वर्षाचा आकडा मोडीत काढला. नोंद केलेल्या या ३१ गुन्ह्यांत गांजा, चरस, हेरॉईन, कोकेन, एलएसडी, एमडीएमएल सारखे ड्रग्स जप्त केले केले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ३० लाख रुपयाहून जास्त होत असल्याची माहिती निरीक्षक  दळवी यांनी दिली.
कारवाईत स्थानिक नागरिकांसोबत देश-विदेशातल्या नागरिकांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. त्यात ८ स्थानिकांचा, ८ विदेशी नागरिकांचा तसेच १६ इतर राज्यातील नागरिकांचा समावेश होता. विदेशी नागरिकात नायजेरियन नागरिकांचा जास्त प्रमाणावर समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या विरोधांत गुन्हेही नोंद करण्यात आले आहेत.ड्रग्स विरोधात केलेल्या कारवाईचा एक भाग म्हणून ड्रग्सचा साठा करणाऱ्या दोन घरांना सिल सुद्धा ठोकण्यात आले आहे.
कळंगुट पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कांदोळी या किनारी भागातील एका बंगल्याच्या आवारात सुरु असलेल्या गांजाच्या शेतीवर सुद्धा कारवाई करण्यात आली. कारवाईत १० लाख रुपयांचा गांजा ताब्यात घेऊन नंतर तो नष्ट करण्यात आला. गांजाच्या शेतीवर कारवाई करण्याची परिसरातली तसेच वर्षातली सर्वात मोठी कामगिरी कळंगुट पोलिसांनी केली होती.
कळंगुट या किनारी भागातून ड्रग्सचे उच्चाटन करण्यास पोलीस कटिबद्ध असल्याचे मत दळवी यांनी व्यक्त केले. या किनारी भागाची व्याप्ती पाहता भागाला भेट देणारे बाहेरील नागरिक या भागात आणून त्याची विक्री करतात. त्यामुळे त्याचा नाहक त्रास स्थानिकांना सहन करवा लागत असल्याचे दळवी म्हणाले. अशा लोकांवर कळंगुट पोलीस बारकाईने लक्ष ठेऊन असल्याचे ते म्हणाले. यावर सर्वत्र जागृती करण्यात येणार असून लोकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन दळवी यांनी केले. या कारवाई सोबत परिसरात बेकायदेशीरपणे वास्तव करुन असलेल्या १६ विदेशी नागरिकांवर सुद्धा कारवाई करुन त्यांना अटक करण्यात आले. यात नायजेरियन, रशियन, कझाकिस्तान नागरिकांचा समावेश आहे.