कला अकादमीत कोरगावकर यांच्या फेरनियुक्तीमध्ये घोटाळा:शिवसेना

0
943
 गोवा:कला अकादमीच्या सह थिएटर व्यवस्थापक नियुक्तीमध्ये मोठा घोटाळा असून त्यात  भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शिवसेनेचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ता  जितेश कामत यांनी केला आहे.
 संतोष कोरगावकर यांची १ मार्च १९८९ रोजी कला अकादमीच्या सह थिएटर व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानी ३१ मे २००५ रोजी सर्व सोपस्कार पूर्ण करून सर्व लाभांसकट स्वेच्छा निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या पदासाठी जाहीरात देण्यात आली.त्यानंतर कोरगावकर यांनी परत सदर पदासाठी अर्ज दाखल केला. त्यावेळचे निवड समितीचे सदस्य आणि अकादमीचे अध्यक्ष  प्रतापसिंह राणे आणि उपाध्यक्ष जितेंद्र देशप्रभू यांना पूर्व कल्पना असूनही कोरगावकर यांना मुलाखतीसाठी  परवानगी देण्यात आली. कोरगावकर यांनी पदासाठी हवी असलेली वयोमर्यादा ओलांडलेली असल्यामुळे नियुक्ती नियमात बदल करून १ फेब्रुवारी २००६ रोजी त्यांना परत सह थिएटर व्यवस्थापक जागी नियुक्त करण्यात आले. आता ते नियमित अधिकारी म्हणून पगार आणि निवृत्त अधिकारी म्हणून निवृत्तीवेतन घेतात. त्याशिवाय स्वेच्छा निवृत्तीचे सर्व प्रकारचे लाभ घेतले आहेत. गोव्यातील हा सर्वात मोठा फेरनियुक्ती घोटाळा असून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय व्यक्त करून कोरगावकर यांना त्वरित निलंबित करून त्यावेळीचे नियुक्ती समितीचे सदस्य आणि संबंधित अधिकार्‍यांवर चौकशी करण्याची मागणी कामत यांनी केली आहे.
 कला अकादमीचे अध्यक्ष, कला संस्कृती मंत्री, मुख्यमंत्री, दक्षता विभाग तसेच भ्रष्टाचार विरोधी विभाग यांच्या कडे लेखी तक्रार करणार असल्याचे कामत यांनी सांगितले आहे. अशा प्रकाराचे घोटाळे अन्य सरकारी खात्यात असल्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे कामत यांनी म्हटले आहे.