कलम 370 रद्दवर सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया द्यावी:चौहान

0
997
गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीर मधील 370 कलम रद्द करण्यात आले.हा महत्वपूर्ण निर्णय घेऊन भाजप 70 वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न सोडवला आहे.त्यासाठी पंतप्रधान मोदी अभिनंदनास पात्र आहेत.पंडीत नेहरू आणि काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे गोव्याला देखील देश स्वतंत्र झाल्या नंतर देखील अनेक वर्षे पोर्तुगीज राजवटीच्या जोखडाखाली रहावे लागले असा आरोप करत कलम 370 रद्दवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी,अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान यांनी आज पणजी येथे केली.

राहुल गांधी हे रण छोड दास झाले आहेत असे सांगून चौहान म्हणाले,लोकसभेत झालेल्या पराभवा नंतर पक्षाची पुन्हा बांधणी करायची सोडून त्यांनी मैदान सोडून पळून जाणे पसंत केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची जोडी श्रीकृष्ण आणि अर्जुना सारखी असून दोघांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने वेगाने जात असल्याचे चौहान म्हणाले.

चौहान यांनी पंडीत नेहरू आणि काँग्रेसच्या चुकीच्या धोरणाचा फटका जम्मू काश्मीर आणि गोव्याला देखील बसल्याचा आरोप केला.चौहान म्हणाले,तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्या चुकीच्या धोरणामुळे देश स्वतंत्र झाल्या नंतर देखील गोवा अनेक वर्षे पोर्तुगीजांच्या जोखडाखाली राहिला.पाक व्याप्त काश्मीरचा  प्रश्न  पंडीत नेहरू यांच्या कचखाऊ धोरणामुळेच निर्माण झाल्याचा आरोप चौहान यांनी यावेळी केला.
चौहान यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. पर्रिकर यांनी गोव्यात विकास घडवून आणला असून त्यांचा वारसा विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत चालवत असल्याचे चौहान म्हणाले.
देशातील सर्व स्तरातील लोकांना सोबत घेऊन भाजपला देश बनवायचा आहे.भाजप फक्त सरकार बनवत नाही तर देश सुद्धा बनवतो,याकडे चौहान यांनी लक्ष वेधले.
देशात सध्या 3 कोटी 40 लाख सदस्य झाले असून त्यात आणखी वाढ होईल,असा विश्वास चौहान यांनी यावेळी व्यक्त केला.चौहान यांनी गोव्यात आगमन झाल्या नंतर जुवारीनगर येथे जाऊन वृक्षारोपण केले.त्यांतर कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला त्यांनी मार्गदर्शन केले.

सायंकाळी ताळगाव येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला चौहान यांनी मार्गदर्शन केले.