कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपने म्हादई  विकली : काँग्रेस

0
332
गोवा खबर : राज्यातील भाजपने कर्नाटक निवडणुकीसाठी म्हादईची विक्री केली आहे. आता राजकीय लाभासाठी मगरींचे अश्रू ओसरत आहे, अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
चोडणकर म्हणाले, म्हादईचे पाणी कमी होण्यास भाजपा व त्यांचे नेते जबाबदार आहेत.
म्हादईच्या पाण्याची पातळी कमी झाल्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कबुलीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना चोडणकर म्हणाले, राज्यातील भाजप सरकार म्हादईच्या मुद्दय़ावरून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे हे स्पष्ट आहे. कर्नाटकात, राज्यात आणि केंद्रातही भाजपची सत्ता आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री म्हणतात की कर्नाटकशी या वादावरुन न्यायालयबाहेरील तोडगा निघू शकत नाही, हे आश्चर्यकारक आहे.
म्हादईचे पाणी वळविण्यात आले तर ते कमी होईल, असा अहवाल एनआयओने दिला होता.  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना म्हादई आणि गोव्याची काळजी असल्यास त्यांनी हा अहवाल लोकांपुढे ठेवावा, असे चोडणकर म्हणाले.
सावंत यांना म्हादई त्यांची आई असल्याचे म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण त्यांनी राजकारणासाठी म्हादईंशी तडजोड केली आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला.
गोव्यातील लोकांना माहित आहे की, राजकीय लाभासाठी भाजपने म्हादईशी तडजोड केली आहे. पण तरीही सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भाजपा नेत्यांची भेट घेतली होती. प्रमोद सावंत जर म्हादईबद्दल खरोखरच गंभीर असतील तर आम्ही पंतप्रधानांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यास सुद्धा तयार आहोत, असे चोडणकर यांनी सुचविले.
म्हादईचे पाणी कमी झाले आहे हे मान्य करण्याऐवजी प्रमोद सावंत यांनी सरकार या प्रश्नावर तोडगा काढण्यास अयशस्वी झाले म्हणून चूक मान्य करावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली.
जर आता एवढे पाणी कमी झाले, तर पुढील दहा वर्षांत काय होईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हादईंच्या संरक्षणासाठी काय केले आहे, हे स्पष्ट केले पाहिजे, असे चोडणकर म्हणाले.