कर्नाटकमधील निवडणूक जिंकण्यासाठी पर्रिकर यांनी गोमंतकीयांच्या म्हादई लढयाची खिल्ली उडवली:शिवसेना

0
1739
पणजी:म्हादई नदीबद्दल कर्नाटक सरकारशी हातमिळवणी करून घेतलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निर्णयाचा शिवसेना  निषेध करीत असल्याचे मत शिवसेनेच्या गोवा प्रदेश उपाध्यक्ष राखी नाईक यांनी व्यक्त केले आहे.
 येणाऱ्या निवडणुकीचा विचार करून घेतलेला हा निर्णय आहे, हे तर स्पष्टच आहे. परंतु येणाऱ्या कर्नाटक निवडणुकीत स्वपक्षाला विजयाभिषेक मिळावा याकरिता गोव्याला वेठीस धरणे योग्य नाही. म्हादई नदीच्या मुद्द्यावर नरमाईची भूमिका घेऊन मुख्यमंत्री पर्रीकर यांनी गोवेकरांच्या तब्बल दोन दशकांच्या लढाईची खिल्ली उडवली असल्याची टिका नाईक यांनी केली.
नाईक म्हणाल्या, या नदीवर कर्नाटक सरकारकडून बांधल्या जाणाऱ्या धरणाचा विरोध मागील दोन दशकांपासून गोवेकर करीत आहेत. पक्षाच्या हितापेक्षा राज्याचे हित महत्वाचे हे शिवसेना वेळोवेळी दाखवत आली आहे. महाराष्ट्रातही सत्तेत असूनही राज्याच्या हिताविरुद्ध असणाऱ्या गोष्टीत शिवसेना सत्ताधाऱ्यांविरोधात ठामपणे उभी राहाते. पर्रीकर हे प्रथम गोवेकर आणि नंतर भाजपाचे नेते आहेत, हे त्यांनी विसरू नये.
 केवळ निवडणूक जिंकण्यासाठी पर्यावरणाशी तडजोड आम्हाला मान्य नाही,असे सांगून नाईक म्हणाल्या,  गोवा व गोवेकरांच्या अंतर्गत गोष्टीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना मुळीच नाही. पाहुणे म्हणून नेहमीच त्यांचं आदरातिथ्यासह स्वागत केलं जाईल, परंतु मुख्यमंत्र्यांवर हुकूमशाही गाजवण्याचा हक्क त्यांना नाही. या विषयावर गोवा फॉरवर्ड पक्षाने बाळगलेल्या मौनाबद्दलही आम्ही अचंबित आहोत. विजय सरदेसाई यांनी मुजोर सत्ताधाऱ्यांच्या दबावाने झुकू नये अशी आमची अपेक्षा आहे.
  ‘गोयेकरपणाची’ भाषा बोलणारा गोवा फॉरवर्ड पक्ष सत्तेच्या लालसेपायी स्वतःची तत्व विसरला आहे असा आरोप करून नाईक म्हणाल्या, म्हादई नदीच्या मुद्द्यावर अनेक समाजसेवाक आणि कार्यकर्त्यांकडून विरोध सुरु झालाच आहे. शिवसेनाही त्यांच्या सोबत खंबीरपणे उभी राहील व मुख्यमंत्री आणि गोवा भाजपा दिल्लीच्या दबावाखाली झुकणार नाहीत याची खबरदारी घेईल.