कोडा: आत्मीय संघर्षाचे चित्रण-क्लॉड लालेंदे
‘कमिटमेंट’ हा चित्रपट अस्मितेबाबतची दुविधा, आधुनिक आई व्हावे की परंपरागत माता यातील संघर्षाचे चित्रण आहे. सिनेमा ही एक वैयक्तिक कला आहे, माझ्या चित्रपटाची कल्पना माझ्या अनुभवातून आणि भावनेतून निर्माण झाली असे मत सेमिह काप्लानोग्लू या तुर्क दिग्दर्शकाने आज इफ्फीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
तुर्कस्तान हा पूर्व आणि पश्चिमेच्या संगमावर उभा असलेला देश आहे. तिथे अस्मितेचा प्रश्न हा नेहमी उंबरठ्यावर असतो. ओरहान पामुक सारख्या लेखकालाही तो हाताळायचा असतो. भारत आणि तुर्कस्तान सारख्या देशांमध्ये हा संस्कृती संघर्ष सर्जनाच्या प्रक्रियेला संवेदनशील बनवतो असेही ते म्हणाले.
‘कमिटमेंट’ हा ऑस्करसाठी तुर्कस्तानचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी यंदा निवडलेला चित्रपट आहे.
‘कोडा’ या कॅनेडियन चित्रपटाचे दिग्दर्शक क्लॉड लालोंदे यांनीही या पत्रपरिषदेत आपले अनुभव मांडले. त्यांचा चित्रपट एका प्रख्यात पिआनो वादकाच्या आत्मीय संघर्षाची कथा सांगतो. इफ्फीच्या जागतिक प्रिमियर विभागात तो आज झळकला. आपण जेव्हा गर्तेत असतो तेव्हा त्याच्या निराकरणाची कळ आपल्या व्यक्तीमत्वातच कुठेतरी असते, हा अनुभव या चित्रपटात उभारला असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु असा चित्रपट लिहायला एखाद्या वर्षाइतका अवधीही लागू शकतो, असे ते म्हणाले. कोडा हा चित्रपट वार्धक्य, संगीत, डिप्रेशन या विषयाशी निगडीत आहे.