कदंब च्या कर्मचार्‍यांसाठी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते चार हजार औषध वाटप

0
636

 

गोवा खबर:जनतेच्या भल्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून दिवस रात्र काम करत असलेल्या कदंबच्या चालक , वाहक  व अन्य कर्मचार्‍यांना औषधांचा वाटप करण्यात आले आहे. या औषधांचा दोन महिन्यात निश्चिीत परिणाम आढळला असून  प्रतिकारशक्तीत वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या औषधांचा तीन वा चार दिवस वापर केला तर कोरोनाची बाधा होणार नसल्याचे केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक  यांनी बुधवारी सांगितले.

पर्वरी येथील कदंब महामंडळांच्या मुख्यालयात बुधवारी झालेल्या एका सोहळ्यात केंद्रीय आयुषमंत्री नाईक यांच्याहस्ते कदंब महामंडळांच्या कर्मचार्‍यांना  4 हजार च्यवनप्राशच्या बाटल्यांचे तसेच  कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणार्‍या औषधांचे वाटप करण्यात आले.

कदंबचे अध्यक्ष कार्लोस आल्मेडा म्हणाले, की श्रीपादभाऊंना गोमंतकीयांबदद्ल प्रेम आहे. गोमंतकीय आजारी पडू नये, म्हणून त्यांचा प्रयत्न आहे. कदंब हे नेहमीच जनतेसाठी काम करत असून आमच्या कर्मचार्‍यांना श्रीपादभाऊंच्या आजच्या औषध वाटपामुळे दिलासा मिळाला आहे.

सरव्यवस्थापक संजय घाटे म्हणाले, की कदंबचे अनेक चालक अनेक तास बस हाकत असून  काहीजण  रात्री उशीरापर्यंत काम करत असतात. याशिवाय, कदंब महामंडळाच्यावतीने  चालकांना ‘फेस शिल्ड’ही दिले जात आहेत.  शाळेच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ने-आण करण्यासाठी सुमारे 78 बसेस वापरात आणल्या जाणार असून या सुरक्षेचे उपायांमुळे मुलांच्या आरोग्याला धोका असणार नाही.

यावेळी कदंबचे  व्यवस्थापकीय संचालक वेनान्सिओ फुर्तादो , महानंद अस्नोडकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.