ओम बिर्ला यांची लोकसभेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून स्वागत

0
1625

 

 

 गोवा खबर:17 व्या लोकसभेच्या सभापतीपदी ओम बिर्ला यांची एकमताने निवड करण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. सभागृहात आज मोदी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. या सभागृहाच्या सभापतीपदी आशा अनुभवी व्यक्तीची निवड होणे सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या.

ओम बिर्ला गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक कार्यात कार्यरत आहेत. विद्यार्थी चळवळीपासूनच त्यांनी समाजकारणात सहभाग घेतला आणि तेव्हापासून सातत्याने ते समाजाची सेवा करत आहेत. राजस्थानमधल्या कोटा शहराच्या विकासासाठी बिर्ला यांनी घेतलेल्या मेहनतीचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.

सभापती महोदयांशी आपला गेल्या अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. कच्छ भागात झालेल्या भूकंपानंतर तसेच केदारनाथ येथे आलेल्या भीषण महापूरानंतर ही शहरं पूर्ववत करण्यासाठी ओम बिर्ला यांनी अथक प्रयत्न केले होते. त्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. 17 व्या लोकसभेच्या सभापतीपदी शांत आणि दयाळू नेते लाभलेले आहेत, असे ते म्हणाले.

लोकसभेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी सभापती महोदयांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.