ओदिशामध्ये कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्रात मध्य-पश्चिम भागात लुबान चक्रीवादळ

0
1681

गोवा खबर:ओदिशातील कमी दाबाचा पट्टा गेल्या सहा तासात इशान्येकडे सरकला असून फुलबानीच्या इशान्येकडे 30 कि.मी. तर अंगूलच्या नैऋत्यकडील 70 कि.मी. अंतरावर त्याचे केंद्र आहे. पुढील 12 तासात ते इशान्येकडे सरकेल आणि हळूहळू त्याची तीव्रता कमी होईल. त्यामुळे ओदिशातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओदिशा आणि प. बंगालच्या किनारपट्टीवर ताशी 66 कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात समुद्र खवळलेला राहील. मच्छिमारांनी पुढील24 तास समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

अरबी समुद्राच्या मध्य-पश्चिम भागात असलेले लुबान हे चक्रीवादळ गेल्या सहा तासात उत्तरेकडे सरकले असून पुढील दोन दिवसात ते येमेन आणि ओमान पार करेल, अशी शक्यता आहे. पुढील सहा तासात पश्चिम-मध्य अरबी समुद्रात ताशी 145कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छिमारांनी 14 ऑक्टोबरपर्यंत अरबी समुद्र आणि एडनच्या आखातात जाऊ नये,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.