ऑक्सिमित्रांची अडवणूक करण्याचे प्रकार बंद करा :आप

0
256
गोवा खबर: भाजपला गोमंतकीय जनतेची मदत करायची नसेल, तर जे मदत करताहेत त्यांची अडवणूक करणे थांबवा. ऑक्सिमित्रांच्या कार्यात अडथळा आणण्याचे प्रकार बंद झाले पाहिजेत,अशी मागणी आप नेते राहुल म्हांबरे यांनी केली आहे.

आम आदमी पक्षाच्या ऑक्सिमित्र  कार्यकर्त्यांना धमकावण्याचे व त्यांच्या मनात दहशत निर्माण करण्याचे प्रकार सत्ताधारी भाजपचे संगठन आणि सरकार करीत आहे आणि आम आदमी पक्ष त्याचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे. आम्ही गोवेकरांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत आहोत या एवढ्याच कारणामुळे रागावलेल्या भाजपने नुकत्याच संपलेल्या आठवड्याच्या शेवटी गोव्याच्या तीन वेगवेगळ्या भागामध्ये आम आदमी पक्षाच्या ऑक्सिमित्र कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी प्रत्येक संस्था, आस्थापने सर्वसामान्य जनतेसह शरीराचे तापमान आणि आरोग्य तपासण्याचे काम युद्धपातळीवर करीत असताना जे लोक एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना भाजप कशी काय अडवू शकते? त्यांना गोव्यातील लोकांनी कोरोना होऊन त्याचे परिणाम भोगायला हवे आहेत का,असा प्रश्न म्हांबरे यांनी उपस्थित केला.
म्हांबरे म्हणाले,गेल्या आठवड्याच्या शेवटी आपच्या ज़िल्हा परिषदेचे उमेदवार (सावर्डे मतदारसंघ ) सिद्धार्थ पाटील यांना एक धमकीवजा इशारा देणारा दूरध्वनी आला ज्यामध्ये फोनवर बोलणारी व्यक्ती स्वतःला आरोग्य खात्यात असल्याचे सांगत होती. या व्यक्तीने पाटील यांना धमकी दिली आणि त्यांना व त्यांच्या संपूर्ण टीमला नोकरशाहीच्या नाहक वादात अडकवू असा धमकीवजा इशारा दिला. आम्ही फक्त दोनच प्रश्न विचारतो. गोवेकरांना एकमेकांना मदत करणे हे बेकायदेशीर आहे का? हा स्वतःला आरोग्य खात्यात काम करणारा म्हणवणारा तथाकथित अधिकारी गोवेकरांना त्रास देण्याऐवजी कोरोनाला नष्ट करण्याचे आपले काम का करीत नाही?
हणजूण येथील एक आणि म्हापसा येथील अशा आमच्या 2 स्वयंसेवकांना भाजप कार्यकर्त्यांनी धमकावण्याचा प्रयत्न केला. हे भाजप कार्यकर्ते स्वतः गर्दी खेचण्याचा प्रयत्न करीत होते. जे गोवेकर इतर गोव्यातल्या जनतेला मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत त्यांच्याविरुद्ध हिंसक होऊन त्यांना त्रास देण्याचा भाजपचा मनसुबा आहे का,असा प्रश्न म्हांबरे यांनी केला.
गोवेकरांच्या भल्यासाठी आणि आरोग्यासाठी काम करायला भाजपकडे वेळ नाही आणि संसाधनेही नाहीत ,असे सांगून म्हांबरे म्हणाले,जनतेची मदत करायला पुढे सरसावलेले आहेत, त्यांना त्रास द्यायला आणि धमकवायला मात्र त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे, हे स्पष्ट होते. भाजपने गोव्यातील कोरोना संकट ज्या हाताळले त्यामुळे राज्य सत्यानाश होऊन उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहे. जर ते मदत करू शकत नाहीत तर निदान जे करताहेत त्यांच्या मार्गावरून तरी बाजूला झाले पाहिजे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्याबरोबर सरकारी पातळीवर उदासीनताही वाढत आहे.  या उदासीनतेला दुष्ट हेतूची जोड देऊन गोवेकरांच्या बिघडलेल्या आरोग्यामध्ये भर घालण्याचे काम जोरात सुरू आहे.
 जर तुम्ही जीव वाचवायला असमर्थ आहात तर निदान आमच्या मार्गात आडवे येण्यापेक्षा दूर का होत नाहीत,असा प्रश्न उपस्थित करून म्हांबरे म्हणाले, कोरोनाच्या विरुद्ध लढा देण्याचा प्रयत्न करीत असलेल्या गोवेकरांना रोखण्यासाठी गुंडांचा  वापर करण्याचा भाजपचा मानस असल्याचे दिसत आहे.जनतेचा सरकार वरील विश्वास उडाल्याने भाजपचे लोक असले प्रकार करत असून त्यामुळे ते लोकांच्या मनातून कायमचे जातील, असे म्हांबरे म्हणाले.