ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्ससह वायूसेनेची दोन विमाने गोव्यात दाखल

0
227

श्रीपाद नाईक यांची सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी

गोवा खबर : कोरोनाविरुद्धच्या लढाईत गोव्याला मदत करण्यासाठी  रक्षा राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पुढाकाराने भारतीय वायू सेनेची दोन विमाने आज ऑक्सिजन कन्सॅनट्रेटर्स व अन्य वैद्यकीय साहित्यासह गोव्यात दाखल झाली.

गोव्यातील वाढते कोरोना बाधित आणि दिवसें दिवस  वैद्यकीय यंत्रणेवरील वाढता ताण यां गोष्टींचे गांभिर्य लक्षात घेऊन गोवा सरकारने काल सायंकाळी केंद्रीय रक्षा राज्य मंत्री नाईक यांची मदत मागितली. नाईक यांनी त्यादृष्टीने लागलीच पावले उचलली आणि आज वायूसेनेची दोन विमाने ३२३ ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर व अन्य वैद्यकीय उपकरणांसह गोव्यात पोहोचली.

यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री नाईक म्हणाले, “गोव्यासह सर्व राज्यांत महामारीचे मोठे संकट आले आहे. ऑक्सिजनची टंचाई सरकारची डोकेदुखी झाली आहे. दिवसें दिवस ऑक्सिजनची गरज वाढत आहे. राज्यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे.”

“भारतीय सेनेने कोरोना विरुद्धच्या लढ्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले असून त्यांचे मदत कार्य जोरात सुरू आहे. दोस्त राष्ट्रांनी पुरवलेल्या ऑक्सिजनसह इतर वैद्यकीय सामुग्री भारतात आणण्यात नौदल मोलाची कामगिरी बजावत आहे, तर वायूसेना मदत करण्यासाठी एका पायावर तयार आहे,” असे नाईक पुढे म्हणाले.

“गोव्यात लवकरात लवकर ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत राज्य सरकारने वेळीच आपल्याला त्यांची गरज कळवावी. ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू,” असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

श्रीपाद नाईक यांनी सर्व सहकार्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे.