एलआयसीकडून “जीवन शांती” या नव्या योजनेची सुरुवात

0
2241

गोवा खबर:भारतीय जीवन आयुर्विमा महामंडळाने ‘जीवन शांती’ या नव्या योजनेची नुकतीच सुरुवात केली आहे. एलआयसीच्या या नव्या योजनेसाठी राज्यात पहिल्याच दिवशी 48 जणांनी पॉलीसी घेतली. त्याचे मूल्य 1 कोटी 84 रुपये असल्याची माहिती एलआयसीच्या गोवा विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक राजेश मिध्धा यांनी आज पणजी येथे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत दिली. यावेळी विपणन व्यवस्थापक अभय कुलकर्णी, उपव्यवस्थापक अरविंद नाणीवडेकर, सहाय्यक शाखाधिकारी निखील बाम यांची उपस्थिती होती.

राज्यात आतापर्यंत ‘जीवन शांती’ या नव्या योजनेचे 54 पॉलिसीधारक आहेत. ही योजना लोकांमध्ये चांगलीच लोकप्रिय होत असल्याची माहिती राजेश मिध्धा यांनी दिली. गोवा विभाग चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत 200 कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठेल असा विश्वास राजेश मिध्धा यांनी यावेळी व्यकत केला.

‘जीवन शांती’ हा प्लॅन वैयक्तिक लाभधारकास तसेच अवलंबितांसाठी उपयुक्त आहे. विशेषतः दिव्यांग अवलंबितांसाठी तर अतिशय महत्त्वाचा आहे. तसेच नवीन निवृत्तीवेतन योजना (एनपीएस) धारकांसाठीसुद्धा हा प्लॅन अतिशय महत्त्वाचा असल्याचे मिध्धा म्हणाले. सध्या आयुर्मान वाढत असून, भविष्यात बाजारातील व्याजदर किती राहतील हे सांगणे कठीण आहे. म्हणून एलआयसीने सुनिश्चित दराने पेन्शन देणारी जीवन शांती योजना सुरु केल्याचे ते म्हणाले. पेन्शन सुरु होण्यापूर्वी किंवा सुरु झाल्यानंतर गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास मूळ रक्कम वाढीसह वारसांना मिळेल.