
गोवा खबर:केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज चेन्नईत ‘लिसनिंग, लर्निंग अँड लिडिंग’ पुस्तकाचे प्रकाशन केले. उपराष्ट्रपती म्हणून एम. व्यंकय्या नायडू यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळावर आधारित हे पुस्तक आहे. या काळात देशभरात 330 कार्यक्रमांना उपस्थित राहिलेल्या उपराष्ट्र्पतीची क्षणचित्रे या पुस्तकात पाहायला मिळतात.

या पुस्तकाबद्दल तसेच आपल्या अनुभवांबद्दल बोलताना नायडू म्हणाले की या पुस्तकातून उपराष्ट्र्पती म्हणून पदभार स्वीकारल्यांनंतरचे त्यांचे आयुष्यातले अनुभव मांडले आहेत. आपण राजकारणातून निवृत्त झालो, मात्र सार्वजनिक जीवनातून नाही असे ते म्हणाले. तुम्ही कमावते झाल्यांनंतरही शिकणे सोडू नये असा सल्ला त्यांनी दिला. प्रत्येक व्यक्तीत कामाप्रती बांधिलकी, तळागाळापर्यंत संपर्क, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी संयम आणि लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याचा उत्साह असायला हवा असे ते म्हणाले.
आज चेन्नई में आप सबके साथ उपस्थित हो कर अत्यंत हर्ष का अनुभव कर रहा हूं। इस अवसर पर माननीय गृहमंत्री श्री अमित शाह जी का अभिनन्दन करता हूं जिन्होंने उपराष्ट्रपति के रूप में विगत दो वर्षों के मेरे कार्यकाल के विवरण का लोकार्पण किया। #2YearsinOffice #Listening #Learning #Leading pic.twitter.com/l4aTHrE8qK
— VicePresidentOfIndia (@VPSecretariat) August 11, 2019
कलम 370 हटवल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रणित सरकारच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. ही काळाची गरज होती आणि अनेक वर्षे प्रलंबित होती असे ते म्हणाले. देशात प्रभावी शासनासाठी आवश्यक सुधारणांबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केले. कोणत्याही भाषेला विरोध असता कामा नये तसेच कुठलीही भाषा कुणावरही लादली जाऊ नये असे नायडू म्हणाले. प्रत्येकाने अन्य भाषा शिकताना आपल्या मातृभाषेला प्राधान्य द्यायला हवे असे ते म्हणाले.
आपण या कार्यक्रमाला मंत्री, खासदार, पक्षाचा अध्यक्ष म्हणून आलेलो नाही तर राजकारणाचा एक विद्यार्थी म्हणून आणि आदर्श नेते व्यंकय्या नायडू यांच्याप्रती आदर म्हणून आलो आहोत असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. ‘लिसनिंग, लर्निंग अँड लिडिंग’ हे पुस्तक म्हणजे नायडू यांच्या जीवनाची कथा आहे आणि देशाच्या प्रत्येक युवकासाठी आदर्शवत आहे असे ते म्हणाले.
रालोआ सरकारमध्ये विविध मंत्रीपदे भूषवताना नायडू यांनी दिलेल्या योगदानाचा शाह यांनी उल्लेख केला. स्मार्ट सिटी आणि प्रधानमंत्री आवास योजना नायडू नगर विकास मंत्री असताना सुरु झाल्या आणि आज या योजनांमुळे देशातील शहराचा कायापालट झालेला पाहायला मिळत आहे असे शाह म्हणाले. शेतकरी कुटुंबात जन्मलेले नायडू यांनी कृषी धोरणात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाची त्यांनी प्रशंसा केली. उपराष्ट्र्पती बनल्यानंतरही ते तळागाळातील लोकांच्या संपर्कात होते असे ते म्हणाले.
गेल्या दोन वर्षात नायडू यांनी 19 देशांचा दौरा केला आणि भारताचा संदेश जगापर्यंत पोहचवला असे शाह म्हणाले. एखाद्या नेत्याने देशातील जनतेशी कशा प्रकारे संवाद साधावा याचे नायडू हे उत्तम उदाहरण आहेत असे ते म्हणाले.
तरुणपणी कलम 370 विरोधातील चळवळीत सहभागी झालेले नायडू हा प्रस्ताव मंजूर झाला तेव्हा राज्यसभेचे अध्यक्ष होते ही महत्वपूर्ण घटना असल्याचे ते म्हणाले. मात्र राज्यसभेत बहुमत नसतानाही नायडू यांनी तटस्थ राहून तसेच सदनाचे नियम पाळत प्रस्तावावर साधक चर्चा घडवून ऐतिहासिक विधेयक मंजूर केलं असे शाह म्हणाले.
या कार्यक्रमाला तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पालानीस्वामी, विविध पक्षांचे खासदार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.