एनएफएआय युरोपियन युनियन चित्रपट महोत्सव 2018 आयोजित करणार

0
1585

 

गोवा खबर:भाषेचे अडथळे पार करून जगभरात कल्पना आणि विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी चित्रपट महोत्सव हे सशक्त साधन आहे. नवीन आणि खिळवून ठेवणाऱ्या कथांबरोबरच चित्रपट महोत्सव प्रेक्षकांना त्या काळातल्या स्थानिक वातावरणाचा आनंद मिळवून देतो.

कथा आणि प्रयोगशीलतेने समृद्ध असलेल्या युरोपियन चित्रपटांनी चित्रपट प्रेमींना नेहमीच भुरळ घातली आहे. भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने 6 जुलै ते 12 जुलै दरम्यान युरोपियन युनियन चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे. मोठ्या पडद्यावर युरोपियन देशांच्या संस्कृतीची झलक आधुनिक चित्रपटातून पाहण्याची संधी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि भारतातील युरोपियन महासंघाच्या प्रतिनिधी मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. जगातील विविध भागांमधील वैविध्यपूर्ण चित्रपट दाखवण्याचा एनएफएआयचा उद्देश आहे.

‘9 मंथ स्ट्रेच’ या फ्रेंच चित्रपटाने या महोत्सवाला सुरुवात होईल. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात युरोपियन महासंघातील सदस्य देशांचे 24 वैविध्यपूर्ण चित्रपट इंग्रजी सबटायटल्सवर दाखवण्यात येणार आहेत.

6 जुलै रोजी भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या मुख्‍य प्रेक्षागृहात संध्याकाळी सव्वा पाच वाजता उद्‌घाटन समारंभ होईल. 12 जुलै रोजी ‘लेबीरिंथस’ हा समारोपाचा चित्रपट दाखवला जाईल. त्यानंतर दिग्दर्शक डग्लस बोसवेल यांच्याबरोबर ‘मास्टर क्लास’ कार्यक्रम होईल. चित्रपट प्रेमी तसेच विद्यार्थ्यांना चित्रपट दिग्दर्शकांबरोबर संवाद साधण्याची या निमित्ताने संधी मिळेल.

या महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांनी विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार पटकावले आहेत. तसेच त्यांचे कौतुकही झाले आहे.