एनआयओकडून भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे 25 सप्टेंबर रोजी आयोजन

0
1275

 गोवा खबर:राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था अर्थात सीएसआयआर-एनआयओने 25 सप्टेंबर 2018 रोजी एकदिवसीय भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन केले आहे. या विज्ञान महोत्सवाचे उदघाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात येईल. याप्रसंगी उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ लेविन्सन मार्टीन्स, शिक्षण विभागाच्या सचिव श्रीमती नीला मोहनन यांची उपस्थिती असणार आहे. सीएसआयआर-एनआयओचे संचालक प्रो. सुनील कुमार सिंग यांनी आज पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली.

विज्ञान महोत्सावदरम्यान विद्यार्थ्यांना सागरी विज्ञान आणि तंत्रज्ञान, तसेच सागरी संशोधनातील घडामोडींविषयी माहिती देण्यात येईल. 100 शाळांमधून सुमारे 1200 विद्यार्थी या विज्ञान महोत्सवात भाग घेतील, असे प्रो. सिंग म्हणाले. विद्यार्थ्यांना सागरी जीवन, सागरांचे रसायनशास्त्र, मरीन रोबोटस, सागरी प्रदूषण, सागर आणि हवामान, सागरी सर्वेक्षण या विषयांवर शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची तसेच या विषयावरील चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच राज्यातील ज्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून निवडले आहेत त्यांना या प्रदर्शनात हे प्रकल्प मांडता येतील.

लखनौमध्ये 5 ते 8 ऑक्टोबर 2018 दरम्यान होणाऱ्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचा भाग म्हणून एनआयओ हा महोत्सव साजरा करत आहे. भविष्यात भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव राज्यात भरवण्यासाठी प्रयत्न करु, असे प्रो. सुनील कुमार सिंग म्हणाले. राज्य शासनाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, पत्र सूचना कार्यालय यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.