एक दिवसात अंदाजपत्रक संमत करणे  जनतेप्रती धोकाच :विजय सरदेसाई 

0
641
गोवा खबर:सध्याच्या महामारीच्या काळात सरकार जे अंदाजपत्रक मांडू पाहत आहे त्याला कुठलाही अर्थ नसून हे अवास्तव अंदाजपत्रक मांडणे गोव्याच्या जनतेप्रती धोकाच ठरेल असे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सभापतीना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. एका दिवसाच्या अधिवेशनात ते घाईघाईने मंडण्याऐवजी मागाहून  अधिवेशन बोलावून ते सविस्तर चर्चा करून मांडता येईल असे अशी सूचना देखील सरदेसाई यांनी केली आहे.

सरदेसाई यांनी गुरुवारी हे तातडीचे पत्र सभापतींना पाठविले आहे. गोवा सरकार महामारीचे निमित्त पुढे करून गोव्यातील कोविड परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, पर्यावरणाचा ऱ्हास, मजूर घोटाळा , बेकायदा जमीन रुपांतरे  आदी महत्वाच्या प्रश्नावर आमदाराना बोलू न देता सर्व लोकशाही मूल्ये पायदळी तुडवीत आहे. ही चर्चा व्हावी यासाठीच आपण चार आठवड्यांच्या व्हर्चुअल अधिवेशनाची मागणी केली होती पण ही सूचना अव्हेरली गेली असे त्यांनी म्हटले आहे.
या एका दिवसाच्या अधिवेशनात 7 अधिसूचना आणि 5 विधेयके संमत करण्यासही त्यांनी विरोध केला असून या अधिवेशनात फक्त राज्यातील महामारीची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आणि म्हादई पाणी प्रश्न, रेल्वे मार्ग दुपदरीकरण, वृक्षतोड, कोळसा वाहतूक अशा पर्यावरणीय प्रश्न या तीन गोष्टीवरच चर्चा व्हावी अन्य विषय नंतर पूर्ण काळाचे अधिवेशन बोलावून घेण्यात यावेत अशी मागणी केली आहे.