एअरबीएनबीकडून पहिल्या बॉलिवुड यजमानांचे स्वागत

0
405

 

 

गौरी आणि शाहरुख खान या बॉलिवुडच्या जोडप्याने आपल्या नवी दिल्लीतील घराचे दरवाजे एअरबीएनबीवर खुले केले

एअरबीएनबीवरील पाहुण्यांच्या स्वागतासाठी गौरी खानकडून तिच्या घराची खास सजावट

 

आपल्या दिल्लीतील घरी निवासाची आयुष्यात एकदाच मिळणारी संधी देऊन बॉलिवुड आयकॉन शाहरुख खान व त्याची सुप्रसिद्ध अंतर्गत सजावटकार (इंटिरिअर डिझाइनर) पत्नी गौरी खान अधिकृतरित्या एअरबीएनबीचे यजमान बनले आहेत. आपल्या ३० वर्षांच्या सुपरस्टारपदाच्या कालावधीतील शाहरुखच्या सुप्रसिद्ध शैलीला अभिवादन करत एअरबीएनबीची ‘होम विथ ओपन आर्म्स’ ही मोहीम भारतीयांना खान कुटुंबाच्या वडिलोपार्जित घरात राहण्याची संधी देणार आहे.

दक्षिण दिल्लीतील झाडे व हिरवळीने समृद्ध अशा पंचशील पार्कमध्ये खान कुटुंबाचे हे घर असून गौरीच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत त्याची सजावट करण्यात आली आहे. हे सुप्रसिद्ध कुटुंब आता मुंबईत राहात असले तरी त्यांच्या आयुष्यात आणि आठवणींमध्ये दिल्लीच्या या घराला विशेष स्थान असून आपल्या तिन्ही मुलांचे संगोपन त्यांनी या घरात केले आहे आणि आजही दिल्लीत आले की ते याच घरात राहतात. व्यक्तिगत वस्तू आणि जगभरातील प्रवासात जमा झालेली स्मृतिचिन्हे यांनी हे घर भरले असून शाहरुख आणि गौरी यांचा सुरुवातीच्या काळातील जोडपं म्हणून आणि नंतर एक संपूर्ण कुटुंब म्हणून झालेल्या प्रवासाचे प्रतिबिंब या घराच्या रुपाने पाहायला मिळते.

 

दिल्लीतील एरवीच्या गजबजाटात जणू शांततेचे मृगजळ असलेले खान कुटुंबाचे हे घर ठाशीव रंगछटा, असंख्य खिडक्यांमधून येणारा भरपूर उबदार व नैसर्गिक प्रकाश आणि कलात्मक वस्तूंच्या लक्षवेधक संग्रहाने नटलेले आहे. समृद्ध पोताच्या भिंती, रंगबिरंगी कापडी चित्रे (टेपेस्ट्रीज) आणि चमकदार झुंबरांमुळे हे घर उजळून निघाले आहे. जमिनीपासून छतापर्यंत भिडलेले फ्रेंच पद्धतीचे दरवाजे रंगबिरंगी छटांच्या फुलांनी भरलेल्या विस्तीर्ण बागेत आपल्याला घेऊन जातात. मात्र, या घरातील सजावटीतील सर्वात लक्षवेधक घटक आहे तो या कुटुंबाच्या गेल्या अनेक वर्षांच्या आठवणी उलगडणारा व्यक्तिगत सौंदर्यानुभव. मास्टर बेडरुममध्ये छायाचित्रे व व्यक्तिगत वापराच्या वस्तूंनी एक भिंत सजली आहे. यात या दाम्पत्याचा मुलगा आर्यन याने वापरलेली बॅडमिंटनची पहिली रॅकेट, मुलगी सुहानाचे मेकअप ब्रश आणि तिने जमा केलेली फुलपाखरे, मुलगा अबरामला पहिल्या वाढदिवसाची भेट म्हणून दिलेले चांदीचा आरसा आणि कंगवा, शाहरुख खानच्या आवडीच्या चित्रपटांच्या मूळ निगेटिव्ज आदींचा समावेश आहे. दुसरी भिंत शाहरुख आणि गौरी यांनी त्यांच्या नातेसंबंधांच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये स्वत:च्या हाताने बनवून परस्परांना दिलेल्या कार्ड्सनी सजली आहे. अन्य कुठल्याही गोष्टींपेक्षा हा व्यक्तिगत अनुभव या घराला एकदम खास बनवतो.

“होम विथ ओपन आर्म्स’ मोहिमेमुळे पाहुण्यांना बॉलिवुडच्या या सुप्रसिद्ध जोडप्याचा नॉस्टॅल्जिया पुन्हा जगण्याची दुर्मीळ संधी मिळणार आहे. १८ नोव्हेंबर पासून या कॅम्पेनला सुरुवात होणार असून भारतीय नागरिक या संधीचा विजेता होण्यासाठी अर्ज करू शकतात. विजेत्या भाग्यवान जोडप्याला १३ फेब्रुवारी २०२१ रोजी या घरी एक रात्र राहण्याची संधी मिळणार आहे. विजेत्या जोडप्याला गौरीने स्वत: तयार केलेला कार्यक्रम, खान कुटुंबियांच्या पसंतीचे जेवण, शाहरुख खानच्या पसंतीचे, तसेच त्याचे स्वत:चे यशस्वी सिनेमे पाहाण्याची संधी आणि कुटुंबाकडून स्मृतीचिन्ह म्हणून घरी घेऊन जाण्यासाठी पर्सनलाइज्ड वस्तूंची भेट मिळणार आहे.

 

दिल्ली आणि एअरबीएनबीसमवेतच्या भागिदारीबाबत गौरी आणि शाहरुख खान म्हणाले, “आमच्या ह्रदयात दिल्लीला विशेष स्थान आहे; दिल्ली हे आमच्यासाठी नेहमीच घर राहील. या शहराला दिलेल्या प्रत्येक भेटीत आमच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी ताज्या होतात आणि म्हणूनच दिल्लीतील आमच्या घरात पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी एअरबीएनबीशी भागिदारी करून आम्ही आनंदित झालो आहोत. जगभरातील आमच्या प्रवासात आम्हाला आमच्या घराची उणीव भासणार नाही, याची काळजी एअरबीएनबीने नेहमीच घेतली असून या विशेष भागिदारीच्या माध्यमातून पाहुण्यांसाठी आमच्या घराचे दरवाजे खुले करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

 

या उपक्रमाबाबत एअरबीएनबीच्या आग्नेय आशिया, हाँगकाँग आणि तैवानचे महाव्यवस्थापक अमनप्रीत सिंग बजाज म्हणाले, “एअरबीएनबी आपल्या पाहुण्यांसाठी जगभरात आगळेवेगळे आणि अविस्मरणीय असे अनुभव मिळवून देते. आज अतिशय खास अशा उपक्रमासाठी गौरी आणि शाहरुख खान यांच्यासमवेत भागिदारी करताना आम्ही अत्यंत रोमांचित झालो असून याद्वारे त्यांच्या दिल्लीतील घरात प्रथमच पाहुण्यांना प्रवेश करता येणार आहे. जगभरातील आणि पिढ्यानपिढ्याचे फॅन्स बॉलिवुडच्या या आयकॉनिक जोडप्याच्या प्रवासाचे साक्षीदार असून त्यांच्या घरात स्वागत होण्याची ही दुर्मीळ संधी कदाचित केवळ एअरबीएनबीवरच आहे.”

 

आयुष्यातील या एकमेवाद्वितीय संधीसाठी नोंदणी कशी कराल?

 

गौरी आणि शाहरुख खान यांच्या घरी १३ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्रभरासाठी राहाण्याची संधी मिळणार आहे. या अभूतपूर्व अशा संधीसाठी नोंदणी करण्यासाठी एअरबीएनबी इच्छुक पाहुण्यांना ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत “ओपन आर्म्स वेलकम” म्हणजे त्यांच्यासाठी नेमके काय, हे सांगण्यासाठी आमंत्रित करत आहे. एअरबीएनबी आणि गौरी खान यांचा समावेश असलेली निवड समिती विजेत्याची निवड करेल आणि १५ डिसेंबर २०२० रोजी विजेत्याच्या नावाची घोषणा केली जाईल.

 

विजेत्याला मिळेल :

 

  • गौरी आणि शाहरुख खान यांच्या दिल्लीस्थित पंचशील पार्क येथील घरी १३ फेब्रुवारी २०२१ रोजी एका जोडप्यास रात्रभर निवासाची संधी
  • निवासाच्या संपूर्ण कालावधीत प्रवासासाठी आलिशान गाडी, ज्यात इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पिक अप, तसेच ड्रॉप व दिल्लीतील अन्य ठिकाणी येण्याजाण्याचाही समावेश
  • गौरी खानकडून पर्सनलाइज्ड वेलकम नोट
  • खान कुटुंबाच्या आवडत्या पदार्थांचा समावेश असलेले भरगच्च डिनर
  • शाहरुख खानच्या आवडीचे सिनेमे पाहाण्याचे प्रदीर्घ सत्र
  • कुटुंबाकडून स्मृतिचिन्ह म्हणून पर्सनलाइज्ड भेटवस्तू