ऊर्जा वेलनेस सेंटरतर्फे जागतिक महिला दिनानिमत्त चर्चासत्र

0
312
 गोवा खबर:ऊर्जा वेलनेस सेंटर तर्फे सिल्व्हर लाइन वर्ल्डच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उद्या 7 मार्च रोजी येथील रवींद्र भवनमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला सकाळी सव्वा दहा वाजता महिलांचे हक्क आणि विशेषाधिकार यावर समाजसेविका आवदा व्हिएगस यांचे व्याख्यान होणार आहे.त्यानंतर पावणे दहा ते सव्वा अकरा दरम्यान स्वरक्षणाचे तंत्र यावर कार्यशाळा होणार असून पोलिस उपनिरीक्षक संध्या शर्मा त्यावर मार्गदर्शन करणार आहेत.
सकाळी सव्वा अकरा ते पावणे बारा दरम्यान घरातील विद्युत उपकरण हाताळताना घ्यायची खबरदारी यावर तज्ञ यशवंत गावस मार्गदर्शन करणार आहेत.दुपारच्या सत्रात चर्चात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
सायंकाळी 4 वाजता चौगुले उद्योगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तेजश्री पै यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्धाटन केले जाणार आहे.
शेवटच्या सत्रात स्त्री आणि स्त्रीत्व या विषयावर चर्चासत्र होणार असून त्यात सुलक्षणा सावंत,तेजश्री पै, आवदा व्हिएगस,दिपाली नाईक, दिपा मिरिंगकर,अनघा आर्लेकर,कविता आमोणकर आणि विद्या शिंक्रे सहभागी होणार आहे.त्यानंतर पारितोषक वितरण आणि समारोप सोहळा होणार आहे.कार्यक्रमाला हजेरी लावून सहकार्य करावे,असे आवाहन डॉ. स्नेहा भागवत यांनी केले आहे.