उसगावात बसच्या धडकेत कार मधील दोघे ठार

0
675

गोवा खबर:तिस्क-उसगाव येथे प्रवासी बस व कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील अन्य एक तरुणासह बसमधील दहा प्रवासी जखमी झाले आहेत. 

रविवारी सायंकाळी  तिस्क उसगाव येथील पोलीस चौकीजवळ फोंडा-डिचोली मार्गावर हा अपघात झाला. लॉरेन्स जोसेफ गोन्साल्विस (28, रा. प्रतापनगर-धारबांदोडा) व सुनिल रत्नाकर नाईक (35, रा. पालवाडा – उसगाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.अपघातानंतर फोंडा-डिचोली मार्गावरील वाहतूक बराचवेळ खोळंबून राहिली.

जीए 01 डब्ल्यू 4977 या क्रमांकाची ‘साई कामाक्षी’ ही प्रवासी बस डिचोलीहून होंडामार्गे फोंडा येथे जात  होती तर जीए 03 सी 4516 या क्रमांकाच्या फोर्ड कारमधून लॉरेन्स, सुनिल व त्यांचा अन्य एक मित्र तिस्क उसगावहून डिचोलीच्या दिशेने निघाली होते. पोलीस चौकीपासून काही अंतरावर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या जोरदार धडकेने कारगाडीचा चक्काचूर झाला व आतील लॉरेन्स व सुनिल यांचा जागीचा मृत्यू झाला. लॉरेन्स हा स्टेरिंगजवळ अडकून पडला  होता. साधारण दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात मदत पथकांना यश आले. कारमधील अन्य एकजण गंभीर जखमी झाला. याशिवाय बसमधील नऊ प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर तिस्क पिळये येथील इस्पितळात उपचार करण्यात आले.

पंकज रामा बाली (22, मडगाव), बिंबलेश शिवराम भारती (25, वार्का), शर्मिला कुंभार (अवंतीनगर-तिस्क), आनंद मयेकर (50, सिद्धेश्वरनगर-तिस्क) लक्ष्मी सखाराम गोवेकर (60, तिस्क उसगाव) अशी बसमधील प्रवाशांची नावे असून इतरांवर खाजगी इस्पितळात उपचार करण्यात आले. अपघातानंतर बसचालक राजाराम गणपत तोरस्कर (38, रा. तिस्क उसगाव) याला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे.