उपराष्ट्रपती निवडणूक: ७१३ खासदारांचं मतदान

0
1000

उपराष्ट्रपतिपदासाठी सुरू असलेल्या निवडणुकीत आतापर्यंत ९० टक्क्यांहून अधिक मतदान झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह गोव्याचे मुख्यमंत्री तथा उत्तर प्रदेशचे राज्यसभा खासदार मनोहर पर्रीकर ,   खासदार सचिन तेंडुलकर व अभिनेत्री रेखा यांनीही मतदानाचा हक्क बजावला. दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत एकूण ७१३ खासदारांनी मतदान केलं.

सकाळी दहा वाजता मतदानाला सुरुवात झाली. सत्ताधारी एनडीए आघाडीचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी सुरुवातीलाच मतदान केलं. दुपारपर्यंत बहुतेक खासदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: ट्विट करून मतदान केल्याची माहिती दिली. संख्याबळ पाहता व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्चित असल्यानं मतदानाच्या वेळी भाजप खासदारांमध्ये विशेष उत्साह दिसत होता. मतमोजणी आज संध्याकाळीच होणार असून त्यानंतर लगेचच देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींचं नाव घोषित केलं जाणार आहे.