उपमुख्यमंत्री आजगांवकर यांच्याहस्ते कंत्राटी कामगारांना नियुक्ती पत्रांचे वितरण

0
646

 

गोवा खबर:उपमुख्यमंत्री मनोहर आजगांवकर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामगार पूरवठा संस्थेखाली नोंदणी झालेल्या कंत्राटी कामगारांना नियुक्ती पत्रे वितरीत केली. कंत्राटदार किंवा कंत्राट संस्थेखाली काम करणा-या कामगारांची आता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामगार पूरवठा संस्थेखाली नोंदणी झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने पेडणे येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

     सार्वजनिक बांधकाममंत्री  दिपक पाऊसकर, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार  दयानंद सोपटे, पेडणेचे नगराध्यक्ष  श्वेता कांबळी, माजी नगराध्यक्ष  उषा नागवेकर यावेळी उपस्थित होत्या.

     याप्रसंगी बोलताना  आजगांवकर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संस्थेत नावनोंदणी झाल्याबद्दल कंत्राट कामगारांचे अभिनंदन केले आणि सार्वजनिक बांधकाम खात्यात काम करणा-या कंत्राटी कामगारांची दीर्घ काळाची मागणी लक्षात घेऊन सरकारने त्यांची सार्वजनिक बांधकाम खात्यांच्या कामगार पूरवठा संस्थेखाली नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी कंत्राटी कामगारांना आपल्या संबंधित क्षेत्रात समर्पितपणे आपले कार्य चालू ठेवण्याचा सल्ला दिला.

     यावेळी बोलताना पाऊसकर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी कंत्राटी कामगारांनी गेली १० ते १२ वर्षे आपली सेवा दिली आणि आता त्यांची नोंदणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मजूर पूरवठा संस्थेत केल्याचे सांगितले. त्यामुळे कंत्राटी कांगारांना सर्व सुविधा मिळतील. पेडणेत विविध विकास कामे हाती घेण्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले.

     यावेळी बोलताना  सोपटे यांनी लोकांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी आपले कर्तव्य बजाविण्याचा सल्ला कामगारांना दिला आणि सार्वजनिक कामगार हा लोकांच्या सेवेसाठी असल्याचे ते म्हणाले.

      संतोष मळीक यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर माजी नगराध्यक्षा श्रीमती उषा नागवेकर यांनी आभार मानले.