उपमुख्यमंत्रीआजगांवकर यांच्या हस्ते पेडणे येथे वाहतूक कार्यालय आवाराचे उद्घाटन

0
325

गोवा खबर:आपण जरी करोना महामारीच्या संकटातून जात असलो तरी सरकार राज्यांच्या विकासास गती देण्यासाठी परिश्रम करीत आहेत. सहायक वाहतूक संचालकासाठी पेडणे येथे नवीन आवाराचे उद्घाटन म्हणजे विकासाचा पुरावा असल्याचे उप-मुख्यमंत्री श्री. मनोहर आजगांवकर यांनी सांगितले. पेडणे येथील कंदब बस स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर सहायक वाहतूक संचालकाच्या नवीन आवाराचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

पुढे बोलताना उप-मुख्यमंत्र्यांनी या अगोदर हे कार्यालय भाड्याच्या एका छोट्याशा आवारात कार्यरत होते असे सांगितले. सदर आवाराची योग्य देखरेख करण्याची गरज व्यक्त करून त्यांनी स्वच्छतेची गरजही व्यक्त केली.

वाहतूक मंत्री श्री. माविन गुदिन्हो यांनी या कार्यालयाचे लवकरात लवकर उद्घाटन करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले. श्री. गुदिन्हो यांनी मोपा विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भविष्यात पेडणेचा विकास होण्याचा सांगितले. या प्रकल्पामुळे विकासाबरोबरच रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे पेडणे तालुक्याचा सामाजिक-आर्थिक विकास होण्यास मदत होईल असे ते म्हणाले. ७६ कोटी रुपये आर्थिक सहाय्य प्राप्त करण्यास सरकारला यश प्राप्त झालेले असून ते विविध पंचायतींना व जिल्हा पंचायतींना विकास कामे हाती घेण्यासाठी वितरीत करण्यात येईल. लोकांच्या हितासाठी सरकार वाहतूक पध्दतीत सुसूत्रता आणण्याचा सरकारचा विचार आहे.

आमदार आणि जीटीडीसीचे अध्यक्ष श्री. दयानंद सोपटे यांनी आनंद व्यक्त करून सहायक वाहतूक संचालक कार्यालयाला योग्य आवार दिल्याबद्दल उप-मुख्यमंत्र्याचे आणि वाहतूक मंत्र्याचे  आभार मानले. त्यांनी लोकांनी व युवकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला.

यावेळी पेडणे नगरपरिषद श्रीमती. श्वेता कांबळी, सहायक वाहतूक संचालक पेडणे उप-कार्यालय कर्मचारी, श्री. पांडुरंग परब, विविध गावांतील सरपंच आणि वॉर्ड सदस्य, नगरसेवक उपस्थित होते.

वाहतूक विभागाचे संचालक श्री. राजन सातार्डेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. श्री. जे.आर.डिसोझा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.