उद्यापासून गोव्यात पूर्ववत सुरु होणार बीफ विक्री

0
950
पणजी:बीफच्या वाहतूक आणि विक्री बाबत सरकारने दिलेल्या आश्वासनामुळे गोव्यातील बीफ विक्रेते उद्यापासून पूर्ववत बीफ विक्री सुरु करणार आहेत.बीफ वाहतूक आणि विक्री कायदेशीर होत नसल्याचा दावा करत प्राणी मित्र संघटनांनी काही ठिकाणी पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले होते त्यानंतर प्राणी मित्र संघटनांकडून आपली सतावणूक होत असल्याचा आरोप करत बीफ विक्रेत्यांनी गेले 3 दिवस बीफ विक्री बंद ठेवली होती.
सरकार कडून पोलिस संरक्षण आणि सहकार्याचे आश्वासन मिळाल्या नंतर काल रात्री बीफ विक्रेत्यांनी आपला संप मागे घेतला होता.मात्र साठा नसल्याने आज बीफ विक्रेत्यांना आपला व्यवसाय सुरु करता आला नव्हता. उद्या कर्नाटक मधून कायदेशीर रित्या आणल्या जाणाऱ्या बीफच्या वाहतुकी दरम्यान कोणत्याही एनजीओंचा त्रास होणार नाही अशी हमी दिल्यामुळे बीफ विक्रेत्यांनी उद्यापासून बीफ विक्री करण्याचे ठरवले आहे.
काँग्रेसने आज बीफचा विषय तात्काळ न सोडवल्याबद्दल भाजप आघाडी सरकारला अल्पसंख्यांक विरोधी ठवणत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातचे बाहुले असल्याची टिका केली आहे.माजी मुख्यमंत्री फ्रांसिस सार्दीन यांनी आज तथा कथित गो रक्षकांना सरकारचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप केला.
गोवंश रक्षा अभियानने देखील आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.गोव्यातील बीफ व्यवसाय हा पूर्णतः बेकायदेशीर असून कायद्याचे पालन होत नाही शिवाय गोव्या बाहेरुन आणले जाणारे मांस आरोग्यास देखील घातक असल्याचा दावा केला. संघटनेचे प्रमुख हनुमंत परब यांनी गोव्यातील बीफ विक्रेते ज्या कर्नाटक मधील कत्तलखान्यातून बीफ आणतात तो कत्तलखाना आणि प्रमाणपत्र देणारा पशु चिकित्सक बोगस असल्याचे सागंत गाय ही आई समान असून तिच्या बाबतीत असे प्रकार घडले तर त्याला कायदेशीर पद्धतीने उत्तर दिले जाईल असे स्पष्ट केले.
बीफचा विषय 4 दिवस चांगलाच गाजला असून उद्या पासून बीफ विक्री सुरु झाल्यानंतर त्याला पूर्ण विराम मिळणार आहे.गोव्यात दर दिवशी 25 टन बीफची गरज भासते.मात्र प्राणी मित्र संघटनांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे धास्तावलेले कर्नाटक मधील विक्रेते सुरुवातीला 5 टन माल पाठवणार आहेत.परिस्थिति पूर्ण सुधारल्या नंतर पूर्वी प्रमाणे पुरवठा पूर्ववत केला जाईल अशी अपेक्षा बीफ विक्रेत्यांना वाटत आहे.गोव्यात ख्रिश्चन समाज प्रामुख्याने बीफ खातो.याशिवाय पर्यटक देखील बीफचे पदार्थ खाणे पसंत करत असल्याने गेले 4 दिवस त्यांची मोठी गैरसोय झाली होती.