गोवा खबर:उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून आपल्या विकास कामांच्या जोरावर सलग चार वेळा निवडून आलेल्या श्रीपाद नाईक यांना यावेळी देखील मतदारांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे.कार्यकर्ते जोमाने प्रचार कार्यात गुंतले असल्याने नाईक यांनी आघाडी घेतली असून गेल्यावेळ पेक्षा जास्त मते घेऊन नाईक विजयी होतील असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी केला आहे.
नाईक यांचा शेवटच्या टप्प्यातील प्रचार सुरु झाला आहे.प्रत्येक मतदारसंघात बूथ कार्यकर्ते मेळावे आणि छोट्या प्रचार सभा आयोजित केल्या जात असल्याचे सांगून तेंडुलकर म्हणाले,नाईक यांच्या प्रचरात मुख्यमंत्री प्रमोद सावंत,उपसभापती मायकल लोबो,राजेश पाटणेकर,प्रवीण झांट्ये, गोवा फॉरवर्डचे मंत्री जयेश साळगावकर,विनोद पालयेकर,अपक्ष मंत्री रोहन खवंटे, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे,उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी आपली ताकद पणाला लावली आहे.कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या जोडीला असल्याने वातावरण भाजपमय बनले आहे.
काँग्रेसला उत्तर गोव्यात निवडणूक लढवेल असा एकही नेता न सापडल्याने त्यांना दक्षिण गोव्यातून उमेदवार आयात करावा लागला आहे,अशी टिका करून तेंडुलकर म्हणाले,चोडणकर यांना त्यांच्या आमदारांची देखील साथ मिळेनासी झाली आहे.केवळ भाजपवर आरोप करून त्यांचा प्रचार सुरु असून मतदारांनी त्यांच्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे.उत्तर गोव्यात काँग्रेसचा पराभव निश्चित आहे.चोडणकर यांना पराभवाची हॅटट्रिक करून घ्यायची असेल तर लोकसभे नंतर पणजीची पोटनिवडणुक लढवून बघावी.
उत्तर गोव्यातील मात्तबर नेते आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पर्ये आणि वाळपई मतदारसंघातून नाईक यांना 20 हजारांचे मताधिक्य मिळवून देण्याचा चंग बांधला असल्याचे सांगून तेंडुलकर म्हणाले,काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी नाईक यांच्या कामाची स्तुती करून त्यांना निवडून द्या, असे आवाहन केले आहे.शिवाय राणे यांनी प्रचारातून अंग काढून घेतल्याने काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे.
साखळी मतदारसंघा बरोबरच उत्तर गोव्यातील इतर मतदारसंघातून नाईक यांना आघाडी मिळवून देण्यासाठी नूतन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कंबर कसली आहे.सावंत हे तरुण मुख्यमंत्री असून त्यांना राज्याच्या प्रश्नांची चांगली जाण असल्याने मतदार त्यांच्यावर विश्वास ठेवत असून नाईक यांच्या विजयात मुख्यमंत्र्यांचा वाटा मोठा असेल असे तेंडुलकर म्हणाले.
भाजपचे मंत्री आणि आमदार आपापल्या मतदार संघात श्रीपाद नाईक यांना मताधिक्य मिळावे यासाठी दिवस रात्र एक करत आहेत,असे सांगून तेंडुलकर म्हणाले,भाजप सरकारचे घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष मंत्री देखील नाईक यांच्या प्रचारात पूर्ण ताकदीने उतरले आहेत.साळगाव मधून जयेश साळगावकर,शिवोली मधून विनोद पालयेकर,पर्वरी मधून रोहन खवंटे आणि प्रियोळ आणि शिरोडा मधून गोविंद गावडे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने नाईक गेल्यावेळी पेक्षा जास्त मतांनी विजयी होतील असा दावा तेंडुलकर यांनी केला आहे.
मगोचे खरे रूप दाखवून देण्याचे काम उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले आहे.मगोच्या स्वार्थी राजकारणाची झलक यावेळी देखील लोक अनुभवत आहेत.प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या फायद्याची भूमिका घेऊन राजकारण चालवले आहे.अशी स्वार्थी आणि दुटप्पी भूमिका घेणाऱ्या ढवळीकर बंधूंची डाळ आता शिजणार नाही,याकडे तेंडुलकर यांनी लक्ष वेधले.
 उत्तर गोव्यातून निवडणूक लढवणार अशी घोषणा केलेल्या नरेश सावळ यांनी आपली तलवार पूर्वीच म्यान केली आहे.राजेश पाटणेकर आणि प्रवीण झांट्ये यांनी डिचोली आणि मये मतदार संघ पिंजून काढत काँग्रेस आणि मगोची हवा काढून घेतली असल्याचे तेंडुलकर म्हणाले.
उत्तर गोव्यातील किनारी भागात उपसभापती मायकल लोबो यांचे वर्चस्व आहे.ते प्रचरात सक्रिय असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली टॅक्सी चालक देखील नाईक यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.त्यामुळे देखील नाईक यांची मते यावेळी वाढतील,अशी अपेक्षा तेंडुलकर यांनी व्यक्त केली आहे.