उत्तर गोव्यातून भाजपतर्फे श्रीपाद नाईक यांनी भरला उमेदवारी अर्ज

0
969
गोवा खबर:उत्तर गोव्यातून भाजप तर्फे आज विद्यमान खासदार तथा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज उत्तर गोवा जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी आर.मेनका यांच्याकडे सादर केला.
यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत,भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, गोवा फॉरवर्डचे मंत्री जयेश साळगावकर,विनोद पालयेकर,माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते.
सकाळी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन श्रीपाद नाईक उमेदवारी अर्ज भरायला गेले.उमेदवारी अर्ज भरल्या नंतर कार्यकर्त्यांच्या जोरावर गेल्या वेळपेक्षा जास्त मतांची आघाडी घेऊन आपणच निवडून येणार असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.
लोकसभेच्या दोन्ही जागा आणि 3 पोटनिवडणुकां मध्ये विजय मिळवून खऱ्या अर्थाने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहुया,असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
काँग्रेसने उत्तर गोव्यात नवखा उमेदवार दिल्याने आमचा विजय निश्चित असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी केला.
यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.उत्पल यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.सध्या तरी पणजी पोटनिवडणुक लढवण्या बाबत कोणताच विचार केलेला नाही.पक्षाचे काम पूर्वीपासूनच करत आहे.योग्य वेळी योग्य तो निर्णय घेईन असे उत्पल यांनी सांगितल्या मुळे पणजीतील कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.