उत्तर गोवा मतदारसंघातून आपची प्रदीप पाडगावकर यांना उमेदवारी

0
861
गोवा खबर:गोवा आम आदमी पक्षाच्या उत्तर जिल्हा समितीच्या बैठकीत, 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोवा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार म्हणून राज्य सचिव प्रदीप पाडगावकर यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. 
याआधी, आप स्वयंसेवक आणि मतदारसंघ समन्वयकां सोबत व्यापक सल्लामसलत केल्यानंतर, चार उमेदवारांची निवड करण्यात आली होती.  त्यात शिवोलीचे अॅड. विष्णु नाईक,  थिवी येथील प्रदीप घाडी आमोणकर, उत्तर गोवा जिल्हा संयोजक, पर्रा येथील व्यवसायीक सुनील सिंग्नापुरकर व  राज्य सचिव प्रदीप पाडगावकर यांच्या नावाचा समावेश होता.
 आप गोवाचे संयोजक एल्विस गोम्स यांचे दक्षिण गोवा मतदारसंघाचे उमेदवार म्हणुन आधीच नाव जाहीर केले आहे. पक्षाच्या राजकीय कार्यकारिणी समितीकडे आता दोन्ही नावे औपचारिक संमतीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
 भारतातील वेगवेगळ्या राज्यातील नावे आम आदमी पक्षाकडून जाहीर केली जातील त्यात गोव्यातील नावांचाही समावेश असेल, अशी माहिती पक्षाचे वरिष्ठ नेते व राज्य कार्यकारिणी सदस्य वाल्मीकी नायक यांनी दिली. यावेळी  मारियो कोर्देरो, सुनील शिंगणापुरकर व प्रदीप घाडी आमोणकर हे इतर राज्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
कोण आहेत प्रदीप पाडगावकर?
 डीएमसी कॉलेज म्हापसा येथून बी. कॉम पदवी मिळवलेले पाडगावकर यांची विद्द्यार्थी मंडळावर विद्यापीठ प्रतिनीधी, सरचिटणीस व अध्यक्ष अशा तिन्ही पदांवर निवड झाली होती. साळगाव येथील  क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक संघटना आदर्श युवक संघाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच ते 16 वर्षांहून अधिक काळासाठी साळगाव मधील दत्त देवस्थानचे सचिव राहिले आहेत. आर्थिक अनियमितता तपासण्यासाठी खासगी नियुक्त वित्त समितीचे सदस्य म्हणून त्यांची गोवा फुटबॉल असोसिएशनवर नेमणुक झाली होती. गोव्यातील  काही दैनिकात पत्रकार म्हणुन काम केल्यानंतर त्यांनी प्रूडेंट चॅनल मध्ये 10 वर्षे काम केले. साधा पत्रकार ते वरिष्ठ व्यवस्थापक पद मिळवत सेवानिवृत्ती घेतली. ते विविध नाटके, चित्रपटांमध्ये आणि टीव्ही मालिकेमध्ये देखील दिसले आहेत. भ्रष्टाचार आणि चुकीच्या कृत्यांवर आधारीत चॅनलवर एका मालिकेत पाडगावकर यांनी साकारलेली दत्तू आप्पाची भुमिका बरीच गाजली होती.