इफ्फी@50 युवा आणि बालकांना चित्रपटांची माहिती, शिक्षण देण्याबरोबरच चित्रपटांकडे आकर्षितही करेल-माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे

0
448

 

 

 गोवा खबर:गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग म्हणून आयोजित इफ्फी@50 या प्रदर्शनाकडे युवा आणि मुले आकर्षित होतील असा विश्वास माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी व्यक्त केला. या प्रदर्शनात विविध गोष्टी आणि माहिती मिळणार असून युवकांना माहितीबरोबरच चित्रपट उद्योगात वापरण्यात येणाऱ्या नवनवीन तंत्रांचीही ओळख होणार असल्याचे खरे यांनी सांगितले. संवादात्मक डिजिटल प्रदर्शन इफ्फी@50 चे उद्‌घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. गोव्यात कला अकादमीजवळ दर्या संगम येथे भरवण्यात आलेले हे प्रदर्शन ब्युरो ऑफ आऊटरिच ॲण्ड कम्युनिकेशनने आयोजित केले आहे.

चित्रपट क्षेत्राकडे युवकांना आकर्षित करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असल्याचे खरे म्हणाले. चित्रपट महोत्सव आणि फिल्म बाझारबरोबरच हे प्रदर्शनही युवा आणि प्रतिनिधींसाठी आकर्षण ठरणार आहे. डिजिटल माध्यमातून चित्रपटांचा इतिहास या प्रदर्शनातून दर्शवला जाणार आहे. 50 ते 60 च्या दशकापासून 2010 पर्यंत चित्रपटांचा विविध टप्प्यातला प्रवास या प्रदर्शनात मांडला आहे. 21 ते 28 नोव्हेंबरदरम्यान सकाळी दहा ते रात्री 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहील.

 

इफ्फीच्या सुरुवातीपासून म्हणजे 1952 पासून आतापर्यंतच्या प्रवासाला केलेला सलाम म्हणजे हे प्रदर्शन. भारतीय चित्रपट जगासमोर आणण्यासाठी इफ्फीचा मंच कसा उपयुक्त ठरला त्याचबरोबर जगभरातले चित्रपट दाखविण्यासाठी इफ्फी हा भारताचा मंच कसा ठरला हे दर्शवण्याचा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

विविध इनस्टॉलेशनद्वारे सिनेरसिकांना भारतीय चित्रपटांत घडलेली क्रांती अनुभवता येईल. याशिवाय व्हर्टीकल डिजिटल डिसप्ले पॅनेल्स, व्हर्च्युअल रिॲलिटी टुल्स, होलोग्राम टेक्नॉलॉजी, अशी उच्च तंत्रज्ञानावर आधारित वैशिष्ट्ये प्रथमच या प्रदर्शनात पाहता येतील.

चित्रपट निर्मिती कौशल्य आणि चित्रपटांचा समाजावरचा प्रभावही प्रेक्षकांना पाहता येईल.

चित्रपट प्रश्नमंजूषा, स्वच्छ भारत, एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर टाळणे, एक भारत श्रेष्ठ भारत यासारख्या सरकारी उपक्रमांवर लघुपट निर्मिती, चित्रकला, यासारख्या स्पर्धा या प्रदर्शनादरम्यान मुलांसाठी आयोजित करण्यात आल्या आहेत. दररोजच्या विजेत्याला गौरवण्यात येणार आहे.

चित्रपट निर्माते राहुल रवैल आणि सुभाष घई यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.