इफ्फी 2018 मध्ये राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने आयोजित केलेले “महात्मा ऑन सेल्युलॉइड” हे प्रदर्शन रसिकांसाठी विशेष आकर्षण

0
2058

 गोवा खबर:भारत 2018 हे वर्ष महात्मा गांधीचे 150 वे जयंती वर्ष म्हणून साजरे करत आहे. या जयंती वर्षाचे औचित्य साधत इफ्फी म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2018 मध्ये महात्मा गांधी यांना आगळ्या-वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.

गोव्यात उद्यापासून सुरु होणाऱ्या 49 व्या इफ्फी दरम्यान भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय एनएफएआय आणि सूचना व प्रसारण मंत्रालयांतर्गत, जनसंपर्क आणि संवाद विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर आधारित बहु-माध्यम डिजिटल प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महात्मा गांधी यांचे आयुष्य आणि त्यांचे कार्य यांचे प्रत्यक्ष दर्शन डिजिटल माध्यमातून रसिकांना घेता येईल.

“महात्मा ऑन सेल्युलॉइड” असे नांव असलेल्या या प्रदर्शनात प्रेक्षकांना महात्मा गांधी यांचा काळ प्रत्यक्ष अनुभवता येईल. संपूर्ण जगाला प्रेरणादायी ठरणारे महात्मा गांधी यांचे विचार आणि कार्य याचा अनुभव लोकांना घेता येईल.

या प्रदर्शनात 35 एम एम पडद्यावर महात्मा गांधी यांच्यावर निर्माण झालेले चित्रपट ‘मेकिंग ऑफ महात्मा’, ‘गांधी’ लोकांना बघता येतील. तसेच प्रेक्षकांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या तेजस्वी काळात पुन्हा घेऊन जाण्यासाठी प्रदर्शनादरम्यान प्रश्न मंजुषा, खेळ आणि संवादात्मक डिजिटल खेळ आयोजित करण्यात आले आहेत.

कला अकादमी पणजी येथे आयोजित हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.