इफ्फी 2018 मध्ये डॉनबासनं पटकावला सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार

0
2085

 

सर्गेई लोझनित्सा ठरले सुवर्ण मयुर पुरस्काराचे मानकरी

चित्रपट क्षेत्रातल्या अमूल्य योगदानाबद्दल सलीम खान इफ्फी विशेष पुरस्काराने सन्मानित

‘वॉकिंग विथ द विंड’ चित्रपटाला आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक

 

गोवा खबर: शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये रंगतदार कार्यक्रमाने 49 व्या इफ्फीची सांगता झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) के. जे. अल्फोन्स, गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, गोव्याचे नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई, केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे, समारंभाचे प्रमुख पाहुणे अनिल कपूर तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. चित्रपटाच्या ‘आनंदाचा प्रसार’ ही यावर्षीची इफ्फीची संकल्पना होती.

सुवर्णमयूर, रौप्यमयूर, जीवनगौरव पुरस्कार आणि इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्‍कार या कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.

 

चित्रपटातल्या अमूल्य योगदानाबद्दल सलीम खान यांना इफ्फी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या वतीने अरबाझ खान यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सलीम खान यांनी 1970 च्या दशकात भारतीय चित्रपटामध्ये क्रांती घडवत बॉलिवूड फॉर्म्युल्यात परितर्वतन आणले. तसेच बॉलिवूड ब्लॉकबस्टरची संकल्पना रुजवली. मसाला चित्रपट आणि दरोडेखोर केंद्रीत चित्रपटांच्या जॉनरचा प्रारंभ केला. अँग्री यंग मॅन ही व्यक्तीरेखा निर्माण करून अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीचा पाया त्यांनी घातला.

 

सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित युक्रेनियन चित्रपट ‘डॉनबास’ला इफ्फी 2018 चा सर्वोत्कृष्ट चित्रपट सन्मान प्राप्त झाला. सुवर्ण मयूर, मानपत्र आणि 40 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराची रक्कम दिग्दर्शक आणि निर्माते यांना समान विभागून देण्यात येते. ‘डॉनबास’ चित्रपटात पूर्व युक्रेनमधल्या दोन फुटीरतावादी गटातला सशस्त्र संघर्ष, हत्या, दरोडे यांबाबतची कथा आहे.

‘इ मा योव्ह’ या चित्रपटासाठी लिजो जोस पेलिस्सरी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून 15 लाख रुपये आणि रौप्य मयूर देऊन सन्मानित करण्यात आले. ॲनास्ताशिया पुश्‍तोवित यांना ‘व्हेन द ट्रीज फॉल’ या युक्रेनियन चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आले. चेंबन विनोद या ‘इ मा योव्ह’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी 10 लाख रुपये आणि रौप्य मयूर पुरस्काराने सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीला गौरवण्यात आले.

‘इ मा योव्ह’ या चित्रपटात मृत्यू आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम उपरोधिक पद्धतीने मांडण्यात आला आहे. या चित्रपटात चंबन यांनी ‘एशी’ची भूमिका साकारली आहे. वडिलांवर योग्य रितीने अंत्यसंस्कार होण्यासाठी धडपडणाऱ्या एशीला अनाकलनीय समस्यांना तसेच विविध स्तरातल्या प्रतिक्रियांना तोंड द्यावे लागते. ‘व्हेन द ट्रीज फॉल’ या चित्रपटात पाच वर्षाची बंडखोर मुलगी वितका, तिची किशोरवयीन चुलत बहिण लारस्या आणि तिचा मित्र सिएर यांची कथा मांडण्यात आली आहे. ग्रामीण युक्रेनमधले भीषण दारिद्रय, उपेक्षा आणि वंशवाद यावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. ॲनास्ताशिया पुश्तोवित यांनी लारस्याची भूमिका साकारली आहे.

‘अगा’ या याकूत चित्रपटासाठी मिल्को लाझारोव्ह यांना विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 15 लाख रुपये आणि रौप्य मयूर असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या चित्रपटात सेडना आणि नानूक या याकुतियामधल्या वृद्ध जोडप्याला बर्फाळ प्रदेशात सामोऱ्या जावे लागणाऱ्या विशिष्ट समस्यांचा वेध घेण्यात आला आहे. ‘रेस्पेटो’ या फिलिपिनो चित्रपटासाठी अल्बेर्टो मॉन्टेरस द्वितीय यांना फिचर फिल्मसाठीचा उत्तम दिग्दर्शक पदार्पणासाठीचा शताब्दी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘वॉकिंग विथ द विंड’ या प्रवीण मोरछले दिग्दर्शित लडाखी चित्रपटाला आयसीएफटी युनेस्को गांधी पदकाने सन्मानित करण्यात आले. पॅरिस इथल्या इंटरनॅशनल कौन्सिल फॉर फिल्म, टेलिव्हिजन ॲण्ड ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि युनेस्को यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. शांतता आणि सलोखा ही गांधीवादी मूल्ये मांडणाऱ्या चित्रपटाला हा सन्मान प्रदान करण्यात येतो.

‘वॉकिंग विथ द विंड’ या चित्रपटात हिमालयीन प्रदेशातल्या आपल्या मित्राची शाळेतील खुर्ची मोडणाऱ्या 10 वर्षाच्या मुलाची गोष्ट सांगण्यात आली आहे. ‘लॉस सिसोन्सिअस’ ब्रिटीझ सेग्नर दिग्दर्शिक पोर्तुगीज आणि स्पॅनिश भाषेतील चित्रपटाचा आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक विभागात विशेष उल्लेख करण्यात आला.

चित्रपट कलाकार अर्जन बाजवा आणि सोफी चौधरी यांनी इफ्फी 2018 च्या सांगता सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. या शानदार सोहळ्यासाठी अनिल कपूर, राकुल प्रीत, चित्रांगदा सिंग, डियाना पेंटी, किर्थी सुरेश आदी चित्रपट सृष्टीतील मान्यवर उपस्थित होते. अभिनेता कबीर बेदी आणि गायक विपिन अनेजा यांच्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

 

गोव्यात 20 तारखेपासून रंगलेल्या 49 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची शानदार समारंभाने आज सांगता झाली. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के. जे. अल्फोन्स, गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, गोव्याचे नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे, समारंभाचे प्रमुख पाहुणे अनिल कपूर यांच्या उपस्थितीत संगीत आणि नृत्य अविष्काराने या सोहळ्याची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) राज्यवर्धन राठोड यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मनोगत व्यक्त करत या महोत्सवासाठीचे ज्युरी, चित्रपट निर्माते, उपस्थित प्रतिनिधी, आयोजक आणि गोव्यातल्या जनतेचेही आभार मानले. चित्रपट हा भाषेपलिकडे असतो. इफ्फीमध्ये सादर झालेल्या चित्रपटातून स्फूर्ती मिळाली. या चित्रपटांनी मनोरंजन केले, असे ते म्हणाले. पुढचे वर्ष इफ्फीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून त्यासाठी कल्पना सुचवण्याचे आवाहन त्यांनी केले.

चित्रपट हे वास्तवाचे दर्शन घडवून समाजाला परावर्तीत करतो. ‘टॉयलेट’ आणि ‘पॅडमॅन’सारखे चित्रपट समाजातील विविध समस्यांचे निराकरणासाठी मदतपूर्ण ठरतात. जेव्हापासून गोवा हे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कायमचे ठिकाण ठरले त्या 2004 सालापासून ते आजपर्यंत गोव्याच्या पायाभूत सुविधांमध्ये आमुलाग्र बदल झाला आहे. इफ्फीसाठी परदेशातूनही मोठी प्रतिनिधी मंडळं आली आहेत. ही बाब नमूद करत भारतीय चित्रपटांचा मोठा प्रभाव असल्याचे केंद्रीय मंत्री अल्फोन्स यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे म्हणाले की, भारताच्या प्रत्येक क्षेत्राच्या सांस्कृतिक, भौगोलिक वातावरणासंबंधी, तेथील समस्या लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेषतत्वाने चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

इफ्फीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद बघता, आणि पुढील वर्षीच्या 50 व्या सुवर्ण महोत्सवाचे इफ्फीचे उद्दिष्ट ठेवून गोव्यात चित्रपटगृहांच्या संख्येत वाढ, चित्रपटांची संख्या वाढवण्यासह पायाभूत सुविधांवर भर दिला जाईल, असे ते म्हणाले.

या समारंभात सर्वोत्तम चित्रपट म्हणून डॉनबास तर सुवर्ण मयूर पुरस्काराचे मानकरी म्हणून सर्गेई लोझनित्सा यांना गौरवण्यात आले. ‘वॉकिंग विथ द विंड’ या चित्रपटाला आयसीएफटी युनेस्को गांधी पदकाचा सन्मान मिळाला.

चित्रपट क्षेत्रातल्या अमूल्य योगदानाबद्दल पटकथा आणि संवाद लेखक सलीम खान यांना विशेष इफ्फी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्यावतीने अरबाझ खान यांनी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. जन्मगाव इंदौर, चित्रपट उद्योग आणि कर्मनगरी मुंबई यांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याचे सलीम खान यांचे मनोगत अरबाझ खान यांनी वाचून दाखवले. जावेद अख्तर यांच्याशिवाय हे शक्य झाले नसते, अशी भावनाही सलीम खान यांनी या मनोगतात व्यक्त केली आहे.