इफ्फीसारख्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात माझ्या चित्रपटाची उद्‌घाटनासाठी निवड होणे हा माझ्यासाठी खरा गौरव- ज्युलियन लॅन्डिस

0
2006

इफ्फीचा उद्‌घाटन चित्रपट द अस्पर्न पेपर्स च्या दिग्दर्शकाचा पत्रकारांशी संवाद  

 गोवा खबर:सर्व सिनेरसिक ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात असा 49 वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव इफ्फी उद्यापासून गोव्यातल्या पणजी येथे सुरु होत आहे. या महोत्सवाचा शुभारंभ ‘द अस्पर्न पेपर्स’ या चित्रपटाने होणार आहे. या निमित्त इफ्फीच्या पूर्वसंध्येला चित्रपटाचे दिग्दर्शक ज्युलियन लॅन्डिस आणि कलाकार निकोलस हाऊ, बार्बरा मिअर आणि लुईस रॉबिन्स यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या चित्रपटाचे कलावंतही आज या महोत्सवात सहभागी होत आहेत. याचा आम्हाला विशेष आनंद होत असल्याचे महोत्सवाच्या संचालकांनी यावेळी सांगितले. या चित्रपटाचा प्रिमियर शो उद्या या महोत्सवात होणार आहे. शुभारंभाच्या चित्रपटासह इफ्फीचे सर्व आठ दिवस अविस्मरणीय ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘द अस्पर्न पेपर्स’ च्या सर्व कलावंतांचे त्यांनी स्वागत केले. चित्रपटाचे दिग्दर्शक ज्युलियन लॅन्डिस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रतिष्ठित महोत्सवाच्या शुभारंभासाठी  हा चित्रपट निवडला जाणे माझ्यासाठी गौरवास्पद असल्याचे ते म्हणाले. हेनरी जेम्स यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर हा चित्रपट आधारलेला आहे असे त्यांनी सांगितले. व्हेनिसमधल्या 19 व्या शतकातल्या कथेविषयी हा चित्रपट असून पूरातन आणि भव्य गोष्टींच्या होणाऱ्या ऱ्हासाविषयी हा चित्रपट भाष्य करतो.

चित्रपटातल्या अभिनेत्री लुईस रॉबिन्स यांनीही यावेळी आपले चित्रीकरणाचे अनुभव सांगितले. पहिल्यांदाच भारतात आलेल्या रॉबिन्स यांनी भारत आणि गोव्यातल्या आतिथ्याचे कौतुक केले.

या चित्रपटात गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते जोनाथन राइस मेअर्स प्रमुख भुमिकेत आहेत. त्याशिवाय अत्यंत नावाजलेले कलाकार या चित्रपटात आहेत.