इफ्फीमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न पूर्ण झालं- “दिग्दर्शकांसोबत संवाद” कार्यक्रमात दिग्दर्शक दीप्ती सिवन यांनी व्यक्त केल्या भावना

0
1915

चित्रपटनिर्मिती हे माझे स्वप्न-संपूरक चित्रपटाचे दिग्दर्शक  प्रबल  चक्रवर्ती

49 व्या इफ्फी मध्ये आज ‘डिकोडिंग शंकर’ आणि ‘संपूरक’ या दोन चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी संयुक्त पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला.

गोवा खबर:चित्रपट निर्मिती ही त्याविषयीच्या शिक्षणातून नाही , तर तुमची आवड आणि ध्यास यातून जन्माला येते, असं मत ‘डिकोडिंग शंकर’ या चित्रपटाच्या दिग्दर्शिका दीप्ती सिवन यांनी व्यक्त केलं. प्रसिद्ध गायक-संगीतकार शंकर महादेवन यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीविषयी त्यांनी माहिती दिली. शंकर महादेवन यांनी त्यांची आवड म्हणून संगीतसाधना केली असं सांगत, या चित्रपटातून आम्हाला हाच संदेश द्यायचा आहे की , तुमच्या आवडी, तुमची स्वप्ने पूर्ण करा, तुमचे शिक्षण काय आहे, याचा विचार करु नका. आपली आवड पूर्ण करण्याचा ध्यास घेतला तर यश आणि आनंद दोन्ही मिळेल, असं सिवन म्हणाल्या.

‘संपूरक’ (अर्धांगिनी) या बांगला भाषेतील चित्रपटाचे दिग्दर्शक प्रबल चक्रवर्ती यांनीही यावेळी आपल्या चित्रपटांविषयी माहिती दिली. चित्रपट निर्मिती हे आपले स्वप्न होते आणि आजही आहे,असे चक्रवर्ती म्हणाले. त्यांच्या संपूरक चित्रपटाची कथा स्त्री-प्रधान असून घर आणि नोकरी दोन्ही आघाड्या यशस्वीपणे सांभाळणाऱ्या स्त्रियांविषयी हा चित्रपट भाष्य करतो.

अमेरिकेत एक अभियंता म्हणून केलेल्या कामांचा अनुभवही त्यांनी यावेळी सांगितला. जागतिक अनुभवांमुळे तुमच्या आयुष्याच्या कक्षा रुंदावतात, असे ते म्हणाले. लघुपट निर्मितीचा अनुभव अतिशय आनंददायक आल्याचेही ते म्हणाले.