इफ्फीकडून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती उत्सवाला प्रारंभ

0
78

गोवा खबर : ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा नेताजी सुभाषचंद्र बोस : द फरगॉटन हिरो हा सिनेमा. 2005 मधील या सिनेमाचे 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज 23 जानेवारी 2021 रोजी विशेष स्क्रिनिंग करत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर साजऱ्या होत असलेल्या 125 वी जयंती उत्सवात सहभाग घेतला.  गोवा येथील पणजी येथे महोत्सव स्थळी याचे विशेष प्रदर्शन करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात नेताजींनी दाखविलेल्या शौर्य आणि धैर्याची प्रेरणा बेनेगल यांच्या चित्रणातून महोत्सवातील आमंत्रित प्रतिनिधींना पुन्हा एकदा मिळेल. “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा” (देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी मला तुम्ही रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो), असे म्हणणारे हे भारताचे थोर स्वातंत्र्य सैनिक म्हणजे एक कृतीशील व्यक्ती होते. ब्रिटिशांच्या सत्तेविरोधातील लढ्यामध्ये, त्यांनी देशातील युवकांना एकत्र येण्याचे आणि स्वातंत्र्यासाठी लढण्याचे आवाहन केले. 220 मिनिटांच्या हिंदी महाकाव्य स्वरुपाच्या युद्धाच्या चरित्रात्मक युद्धपटामध्ये 1941 – 1943 या काळातील नाझी जर्मनी येथील, जपान व्याप्त आशियामधील 1943 ते 1945 या काळातील नेताजींचे जीवन आणि आझाद हिंद सेनेची निर्मिती दरम्यानच्या घटना यांचे वर्णन यामध्ये दर्शविले गेले आहे. यात फ्लॅशबॅक संदर्भाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याची कहाणी देखील समाविष्ट करण्यात आली आहे.

भारत सरकारने नेताजींच्या 125 व्या जयंती वर्षाच्या उत्सवाला प्रारंभ केला असतानाच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात द फरगॉटन हिरो या सिनेमाचे स्क्रिनिंग दाखवणे हा अतिशय चांगला योग आहे. नेताजींचा देशासाठी असलेल्या समर्पण भावनेचा आणि निःस्वार्थ सेवेचा सन्मान करण्यासाठी, त्याचे स्मरण ठेवण्यासाठी सरकारने प्रत्येक वर्षी 23 जानेवारी रोजी नेताजींची जयंती ‘पराक्रम दिवस” म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. पराक्रम दिवसाचा उत्सव हा आपल्या देशातील नागरिकांना, विशेषतः तरुणांना, नेताजींच्या प्रतिकूल परिस्थितीतील दृढ निष्ठेने वागण्याची प्रेरणा मिळवून देण्यात आणि त्यांच्यात देशप्रेमाच्या भावनेने प्रेरित होण्यासाठी प्रयत्न करणारा आहे.

या विशेष स्क्रिनिंगबद्दल बोलताना, महोत्सवाचे संचालक चैतन्य प्रसाद म्हणाले, “नेताजी हे नेहमीच सर्व राष्ट्रीय नेत्यांमध्ये सर्वाधिक प्रिय नेता आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील सर्वोच्च आदर्श राहिले आहेत. द फरगॉटन हिरो या सिनेमाच्या विशेष प्रदर्शनाचे आयोजन हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे दुर्दम्य व्यक्तिमत्त्व आणि देशाप्रति असलेली निःस्वार्थ सेवा यांचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी आहे. या महान स्वातंत्र्य सैनिकाच्या 125 व्या जयंतीनिमित्त, आपण नेताजींच्या देशाप्रति असलेल्या असामान्य योगदानाचे स्मरण करू या.”

नेताजी सुभाषचंद्र बोस – द फरगॉटन हिरो या सिनेमामध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक सचिन खेडेकर हे नेताजींच्या मुख्य भूमिकेमध्ये आहेत. या सिनेमाने 2005 मध्ये राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळविला आहे.

 

नेताजींचा वारसा अमर आहे आणि आजही लाखो लोकांना तो प्रेरणा देत आहे.