‘इन अवर वर्ल्ड’मध्ये अशा विश्वाचे दर्शन घडते ज्यात ‘ती’ स्वमग्न मुले आणि ‘आपण’यांच्या दोन जगात प्रेमाचा पूल बांधलेला आहे : श्रीधर

0
115

गोवा खबर : आज आपण ज्या जगात राहतो आहोत, त्यात जणू दोन जग आहेत- एका ‘आपले’ आणि एक ‘त्यांचे’, असे जग ज्यात ‘आपण’, ‘त्यांना’ समजूत घेण्यात कमी पडतो. आमचा चित्रपट असे जग दाखवणारी खिडकी आहे, कुठल्याही नियम-रुढींच्या चौकटीत न बसणाऱ्या या जगाला केवळ प्रेमभावनेने  समजून घेता येऊ शकते. तसे केले, तरच आपण त्यांना एका जगात सामावून घेऊ शकणारा मार्ग निर्माण करू शकू, अशा ‘एका’जगात, जिथे आपण सगळे परस्पर-स्नेहाचे सहजीवन आणि परस्परांचा आदर ठेवून एकत्र राहू शकू.” असे मत, “इन अवर वर्ल्ड’ या माहितीपटाचे दिग्दर्शक बी एस श्रीधर यांनी व्यक्त केले. गोव्यात सुरु असलेल्या 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-इफ्फी च्या आजच्या चौथ्या दिवशी श्रीधर यांनी  पत्रकार परिषदेततून ‘स्वमग्नतेच्या’ मानसिक आजाराविषयी माहिती देत आशा मुलांच्या भावविश्वाची ओळख करुन दिली. या पत्रकार परिषदेला ‘पिंकी इलि?’ या चित्रपटाचे  दिग्दर्शक पृथ्वी कोन्नुर आणि अभिनेत्री गुंजलम्मा याही उपस्थित होत्या.

ऑटीस्टिक म्हणजेच ‘स्वमग्नता’ हा मेंदूविकार असलेल्या मुलांच्या पालकांना काय त्रास आणि यातना सहन कराव्या लागतात, ते समजून घेण्याची संधी आमचा हा चित्रपट देतो, असे श्रीधर यांनी सांगितले. या सिनेमा बनवण्यामागची प्रेरणा काय होती? या प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले की, ‘या मुलांनाही प्रेमाची आस असते मात्र, त्यांना लोकांशी संवाद साधणे कठीण असते.हे लक्षात आल्यावर मला असे जाणवले की मी ही या मुलांचा दूत बनले पाहिजे आणि त्यातूनच हा माहितीपट जन्माला आला. यासाठी मी या माहितीपटातील तीन स्वमग्न मुलांचा आभारी आहे. त्यांच्यामुळेच आज आमच्या संपूर्ण चमूला ओळख मिळाली आहे. त्यांच्या पालकांचेही आभार” अशा भावना श्रीधर यांनी व्यक्त केल्या.

भारतीय पॅनोरमाच्या कथाबाह्य चित्रपट विभागातील, या 51 मिनिटांच्या माहितीपटात एकही संवाद किंवा पार्श्वनिवेदन देखील नाही, केवळ दृश्यांच्या माध्यमातून तीन स्वमग्न मुले आणी त्यांच्या कुटुंबियांचे जग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्याचवेळी ‘ऑटीझम स्पेक्ट्रम डीसऑर्डर’ या मेंदूविकाराची माहिती देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.

इफ्फीमध्ये 18 जानेवारीला हा माहितीपट पहिल्यांदा दाखवण्यात आला. श्रीधर बी एस यांच्या श्रेड क्रियेटीव्ह लैब  ने निर्मित आणि दिग्दर्शित केला असून श्रीधर यांना आजवर 43 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.

‘पिंकी इलि?’चित्रपटाचे दिग्दर्शक पृथ्वी कोन्नुर यांनी आपल्या चित्रपटाविषयी माहिती देतांना सांगितले की, “ या चित्रपटात, बंगळूरूच्या पार्श्वभूमीवर घडणारी एक सामाजिक चित्तथरारक कथा आपल्याला दिसेल, शहरी जगातल्या मुलांची ही कथा आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात केवळ दोन व्यावसायिक कलाकार असून, इतर सर्वांनी याआधी कधी चित्रपटात काम केलेले नाही. हा संपूर्ण काल्पनिक चित्रपट आहे. चित्रपटाला वास्तववादी स्पर्श देण्यासाठी आम्ही पूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण हैंडीकॅमने केले आहे.” असे दिग्दर्शकांनी सांगितले.

या चित्रपटातून पहिल्यांदाच अभिनय क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या गुंजलम्मा यांनी यावेळी त्यांची भूमिका आणि अनुभवांविषयी सांगितले. गुंजलम्मा यांनी या चित्रपटात सनाम्मा या मोलकरीणीची भूमिका केली आहे. जेव्हा मी या चित्रपटाचे कला दिगदर्शक रामचंद्रन यांना पहिल्यांदा भेटले, तेव्हा मी त्यांना सांगितले की मला केवळ एकच काम उत्तम करता येते, ते म्हणजे, मुलांन संभाळणे, त्यांची काळजी घेणे!  तेव्हा त्यांनी मला सांगितले की तुला सिनेमातही हेच काम करायचे आहे.” असे गुंजलम्मा यावेळी म्हणाल्या.