इतरांच्या आयुष्यात शाश्वत सुधारणा घडवून आणण्याप्रती बांधिलकी मानणे हा शिक्षणाचा खरा अर्थ आहे!

0
1111

भारताच्या 72व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारताचे राष्ट्रपती  राम नाथ कोविंद यांचा राष्ट्रासाठी संदेश

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

1.  एक स्वतंत्र देश म्हणून आपल्या वाटचालीला उद्या 71 वर्षे पूर्ण होत आहेत. उद्या आपण आपला 72वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. यानिमित्ताने मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो. प्रत्येक भारतीय, मग तो इथे राहणारा असो किंवा जगाच्या पाठीवर कुठेही वास्तव्यास असो, 15 ऑगस्ट या दिवसाचे पावित्र्य मानतो. आपल्या सार्वभौमत्वाचा सोहळा म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. कार्यालयांमध्ये, महापालिकांमध्ये, पंचायतींच्या कार्यालयांत, महाविद्यालये आणि शाळांमध्ये तसेच आपल्या परिसरामध्ये आपला राष्ट्रीय ध्वज मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने फडकवला जातो. हा तिरंगा म्हणजे आपल्या देशाचा सन्मान आहे. स्वातंत्र्यासाठी आपण दिलेला लढा आणि आपले आत्मबल यांची आपल्याला सतत आठवण करून देणारे ते प्रतीक आहे. आपल्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आपण आज बरेच काही साध्य करू शकलो आहोत. त्या सर्व प्रयत्नांचे समाधानाने आणि कृतज्ञतेच्या भावनेने पुनरावलोकन करण्याचा हा दिवस आहे त्याचबरोबर हा दिवस आपल्या राष्ट्राच्या उभारणीमध्ये आजही राहून गेलेल्या उणिवांना भरून काढण्याचा नव्याने निर्धार करण्याचाही दिवस आहे – आपल्या देशाचे प्रतिभावान युवक या उणिवा निश्चितच भरून काढतील यात शंका नाही.

2.    1947 सालच्या 14-15 ऑगस्टदरम्यानच्या मध्यरात्री आपला देश स्वतंत्र झाला. आपल्या पूर्वजांनी आणि आजही वंदनीय असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी कित्येक वर्षे, दशके आणि शतकांपासून केलेल्या त्यागाची, कष्टांची आणि शौर्याची ती परिणिती होती. स्वातंत्र्य लढ्यात उतरलेल्या  त्या स्त्री-पुरुषांच्या ठायी असामान्य धैर्य आणि दूरदर्शीत्व होते. ही माणसे देशाच्या विविध प्रांतांमधली, समाजाच्या सर्व स्तरांतील, समुदायांतील आणि आर्थिक स्तरांमधली होती. थोडक्या वैयक्तिक फायद्यांसाठी त्यांना सहज तडजोड करता आली असती पण त्यांनी असे केले नाही. स्वतंत्र, सार्वभौम, विविधतेला जपणाऱ्या आणि समानतेची कास धरणाऱ्या भारताच्या उभारणीप्रती ते संपूर्णपणे कटिबद्ध होते. 9 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनामध्ये ‘भारत छोडो आंदोलनाचा स्मृतीदिन साजरा केला गेला. त्यानिमित्ताने या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्याचे सौभाग्य मला मिळाले.

3.    अशा थोर राष्ट्रभक्तांचा वारसा आपल्याला लाभला आहे हे आपले सुदैव आहे. त्यांनी स्वतंत्र भारत आपल्या हाती सोपवला पण त्याचवेळी आपल्या समाजाचा विकास करण्याचे, सामाजिक उतरंडीवर अगदी शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या माणसाचे सक्षमीकरण करण्याचे, त्यांना गरीबी, सामाजिक आणि आर्थिक असमानतेच्या जोखडातून मुक्त करण्याचे अपूर्ण कार्यही त्यांनी आपल्यावर सोपवले जे आपल्याला सर्वांना मिळून पूर्ण करायचे आहे. एक राष्ट्र म्हणून आपले संपूर्ण सामाजिक जीवन हे त्या स्वातंत्रसैनिकांप्रतीची आदरांजली असायला हवी-तसेच आजवर जे काम पूर्णत्वाला गेलेले नाही ते पूर्ण करण्याप्रतीची बांधिलकी त्यातून दिसायला हवी.

4.   संकुचित राजकीय अर्थाने आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची व्याख्या करायला गेलो तर 15 ऑगस्ट 1947 हा दिवस म्हणजे सर्व आकांक्षांच्या पूर्तीचा दिवस होता असे म्हणता येईल. याच दिवशी तर साम्राज्यशाहीच्या विरोधातील राजकीय लढ्याची यशस्वी सांगता झाली आणि आपण स्वतंत्र झालो. पण स्वातंत्र्याची व्याख्या इतकी मर्यादित नाही. ती एक व्यापक संकल्पना आहे. 1947 नंतर आज अनेक दशके उलटून गेली आहेत. पण आजही आपण एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाप्रमाणेच या देशासाठी आपले योगदान देऊ शकतो. स्वातंत्र्य या संकल्पनेच्या कक्षा रुंदावत आपल्या देशबांधवांसाठी, आपल्या लाडक्या राष्ट्रासाठी नवनव्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण केला तर हे नक्कीच शक्य आहे.

5.    आपले शेतकरी लक्षावधी देशबांधवांसाठी अन्नधान्य पिकवतात. अशा देशबांधवांसाठी, ज्यांना ते कधी प्रत्यक्ष भेटलेले नाहीत किंवा भविष्यात कधीही भेटणार नाहीत. तरीही हे कृषीवल आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी सकस आहार उपलब्ध करून देत देशाचे स्वातंत्र्य अधिक बळकट करत आहेत.  या शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी व त्यायोगे त्यांच्या मिळकतीमध्ये भर पडावी या हेतूने त्यांच्या हाती नवनवे तंत्रज्ञान आणि इतर साधनसुविधा देतांना आपण स्वातंत्र्यचळवळीने दिलेला तत्वांचा वारसा जपत असतो.

6.    आपली सशस्त्र दले डोळ्यांत तेल घालून आपल्या सीमांचे रक्षण करत असतात. कधी बर्फाळ पर्वतांवरच्या खडतर हवामानाचा, कधी आग ओकणाऱ्या सूर्याच्या प्रखर उन्हाचा, कधी महाकाय समुद्राचा सामना करत कधी आकाशातून गस्त घालत मोठ्या धैर्याने देशाचे संरक्षण करत असतात. हे सैनिक परकीय आक्रमणांपासून देशाचे संरक्षण करत भारताच्या स्वातंत्र्याची जपणूक करीत असतात. आपण जेव्हा त्यांना अधिक चांगली शस्त्रे, उपकरणे देण्याचा, ही उपकरणे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी देशातच चांगली पुरवठा साखळी तयार करण्याचा किंवा आपल्या सैनिकांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याचा प्रयत्न करू तेव्हा आपणही आपल्या स्वातंत्र्यलढ्याने आखून दिलेल्या मूल्यांचे आचरण करत असतो.

7.    आपले पोलीस आणि निमलष्करी दले अनेक प्रकारची आव्हाने अंगावर झेलत असतात. दहशतवादाचा मुकाबला करताना, गुन्हेगारीशी दोन हात करतांना, कायदा व सुव्यवस्थेमध्ये येणारे अडथळे दूर करताना किंवा पूरस्थितीसारख्या प्रसंगांमध्ये अगदी सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात देतांना अनेक संकटांशी ते झुंजत असतात. हे करत असताना हे सर्वजण आपल्या नागरी स्वातंत्र्याचे रक्षण करत असतात आणि त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याचा स्तर उंचावून आपण आपल्या स्वातंत्र्यलढ्याने आखून दिलेल्या मूल्यांचे आचरण करत असतो.

8.    महिलांचे आपल्या समाजामध्ये एक खास स्थान आहे. आपला देश अधिक स्वतंत्र कऱणे याचा अर्थ अनेक अनुषंगाने आपल्या देशातील स्त्रियांना अधिक स्वातंत्र्य देणे असा होतो. आई, बहीण, मुलगी किंवा आपले आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे जगू पाहणारी आणि आपल्यातील क्षमतांचा संपूर्ण वापर करण्यासाठी संधी व सुरक्षित वातारवरण हा जिचा हक्क आहे अशी केवळ स्त्री यापैकी कोणत्याही नजरेतून तिच्याकडे पाहिले तरीही तिचे स्वातंत्र्य ही अनिवार्य गोष्ट ठरते. मग आपल्या या क्षमता त्यांनी आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ बनण्यासाठी वापराव्यात किंवा उच्चविद्याविभूषित होऊन देशाच्या मनुष्यबळामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी वापराव्यात. निवडीचा अधिकार हा सर्वस्वी त्यांचा आहे; आणि ही निवड जपण्याचा हक्क आणि क्षमता त्यांना मिळावी असे वातावरण निर्माण करण्याचे काम एक देश म्हणून आणि एक समाज म्हणून आपण आवर्जून करायला हवे.

9.    आपण जेव्हा महिलांकडून चालविल्या जाणाऱ्या व्यवसायांना, नवउद्योगांना पतपुरवठा करीत किंवा घरोघरी एलपीजी सहज उपलब्ध करून देत त्यांच्या सक्षमीकरणामध्ये योगदान देतो तेव्हाही आपण स्वातंत्र्यचळवळीने दिलेल्या मूल्यांचे आचरण करत असतो.

10.  आपली युवापिढी, मग त्यात मुलगे, मुली दोघेही आले, हे भारताची आशा आणि आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतात. आपल्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये तरुण आणि बुजूर्ग अशा सर्वांनीच सक्रीय सहभाग घेतला होता मात्र या लढ्याला मुख्य ऊर्जा पुरविली होती ती युवा स्वातंत्र्यसैनिकांनी. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांनी आपले स्वतंत्र मार्ग अंगिकारले, लढ्याची वेगळी तंत्रे वापरली – पण आपला निर्धार, आपला आदर्शवाद यांच्याबाबतीत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. भारत स्वतंत्र व्हावा, भारताचा भविष्यकाळ अधिक चांगला असावा, इथल्या समाजामध्ये समानतेचे मूल्य अधिक चांगल्या प्रकारे जोपासले जावे यासाठी त्यांनी सतत प्रामाणिकपणे प्रयत्न केले.

11.  आज, देशाच्या युवावर्गाला कौशल्य-विकासाची संधी देत, त्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी हातभार लावत, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, उद्योजकता अशा क्षेत्रांमध्ये त्यांना कुशल बनवित, त्यांच्यातील सर्जनशीलतेला, कारागिरी, संगीतासारख्या गुणांना प्रोत्साहन देत, खेळातील कर्तबगारीला संधी देत, त्यांना मोबाइल अप्स विकसित करण्यासाठी मदत करत आपण जेव्हा त्यांच्यातील अमर्याद क्षमता बहरण्याच्या संधी निर्माण करत असतो तेव्हाही आपण स्वातंत्र्यचळवळीने दिलेल्या मूल्यांचीच पाठराखण करत असतो.

12.  ही काही मोजकी उदाहरणे झाली. अशा अनेक गोष्टी असू शकतील. खरे सांगायचे तर आपले काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करणारा प्रत्येक भारतीय देशाच्या स्वातंत्र्याप्रती आपापले योगदान देत असतो. मग ती व्यक्ती डॉक्टर असो, नर्स असो, शिक्षक असोत, सरकारी कर्मचारी असो, कारखान्यातील मजूर किंवा उद्योजक असो. अगदी लहान वयात ज्यांनी प्रेमाने आपले संगोपन केले त्या  वयोवृद्ध पालकांची देखभाल करणारी व्यक्तीही त्यात आली. यातली प्रत्येक व्यक्ती जेव्हा आपापल्या कार्यक्षेत्राची नितिमत्ता जपत काम करत असते तेव्हा ती आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्यसैनिकांच्या मनातील भारताचीच उभारणी करत असते. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणारा, आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या चोख पार पाडणारा आणि दिला शब्द पाळणारा प्रत्येक नागरिक हा पायाभूत स्तरावर स्वातंत्र्यलढ्याने दिलेला नीतिमत्तेचा वारसाच जपत असतो. इतकेच कशाला साधा रांगेचा नियम पाळणारा, रांगेत पुढे उभ्या असलेल्यांचा नागरी अवकाश, हक्क यांचा आदर करणारा प्रत्येक  नागरिकसुद्धा स्वातंत्र्यचळवळीतील मूल्यांचीच जपणूक करत असतो असे मी म्हणेन, ही अगदीच छोटीशी कृती आहे पण ती करायला हवी आणि ती शिस्त पाळायला हवी.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो!

13.  तुम्हाला वाटत असेल की आतापर्यंत जे काही बोललो ते कदाचित 10 ते 20 वर्षांपूर्वीपर्यंत किंवा कदाचित त्याही आधीच्या कालखंडापर्यंत लागू होते. यात काही अंशी तथ्य जरूर आहे. पण तरीही आज आपण आपल्या इतिहासाच्या अशा एका टप्प्यावर उभे आहोत जो आजवर आपण अनुभवलेल्या कोणत्याही कालखंडाहून खूप वेगळा आहे. आपण अनेक वर्षांपासून उरी बाळगलेली स्वप्न वास्तवात उतरण्याच्या उंबरठ्यावर आहेत. सर्वत्र वीजपुरवठा, उघड्यावर शौच करण्याच्या प्रथेचे निर्मूलन, बेघरपणाचे उच्चाटन, मुख्य म्हणजे सर्व प्रश्नांच्या मूळाशी असलेल्या टोकाच्या गरीबीचे उच्चाटन या गोष्टी आता अवाक्यात आल्या आहेत. या अशा निर्णायक काळामध्ये वादविवादांचे मुद्दे आणि अनाठायी चर्चा यांच्यामुळे मूळ ध्येयापासून आपले लक्ष विचलित होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे.

 

14.  चार वर्षांनी आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होईल. स्वतंत्र देश म्हणून भारताच्या वाटचालीला शंभर वर्षे पूर्ण व्हायला आता 30 वर्षांहूनही कमी काळ उरला आहे. आपण आज घेतलेले निर्णय, आज रचलेला पाया, आज सुरू केलेले प्रकल्प, सामाजिक किंवा आर्थिक क्षेत्रांतील दूरगामी किंवा नजिकच्या विकासासाठी आज केलेली गुंतवणूक जागतिक स्तरावर उद्या आपले स्थान कुठे असेल हे निश्चित करणार आहे.  आपला देश वेगाने प्रगती करत आहे; नवे बदल आत्मसात करत आहे. हा वेग निश्चितच कौतुकास्पद आहे आणि आपल्या नागरी परंपरेला अनुसरून हे बदल घडवून आणण्याचे काम आपल्या लोकांकडून, आपल्या नागरी समाजाकडून होत आहे. नागरीक आणि सरकार यांच्या भागीदारीतून या प्रयत्नांना चालना मिळत आहे आणि वंचितांना अधिक चांगले जीवनमान मिळायला हवे हे भारतीय विचारसरणीचे मूलतत्वच या बदलांच्या केंद्रस्थानी सतत राहिले आहे.

 

15.  मी इथे फक्त एक उदाहरण देईन. ग्राम स्वराज्य मोहिमेअंतर्गत, सात प्रमुख कार्यक्रम गरीबातील गरीब व्यक्तींच्या, अत्यंत वंचित आयुष्य जगणाऱ्या नागरिकांच्या दारापर्यंत नेले जात आहेत. वीजपुरवठा, बँकिंग सुविधा, समाजकल्याण आणि विमा कार्यक्रम आणि आजवर दुर्गम राहिलेल्या भागांमध्येही लसीकरणाची सुविधा अशा कार्यक्रमांचा या मोहिमेत समावेश आहे. स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे पूर्ण होऊनही देशाच्या ज्या भागांमध्ये आजही विकासाची गंगा पोहोचलेली नाही अशा 117 महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये ग्राम स्वराज्य मोहिमेचा विस्तार करण्यात आला आहे.

 

16.  या जिल्ह्यांच्या एकूण लोकसंख्येमध्ये अनुसूचित जाती व जमातींसारख्या कमकुवत वर्गांची संख्या अधिक आहे यात नवल नाही. सामाजिक उतरंडीच्या तळाशी राहून गेलेल्या या वर्गांचे जीवनमान सुधारण्याची एक संधी या मोहिमेच्या निमित्ताने आपल्याला मिळाली आहे. ग्राम स्वराज्य मोहीम ही केवळ सरकारद्वारे चालविली जात नसून सार्वजनिक संस्था, सामाजिक गट यांच्या सहयोगाने ती जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे. आपल्याकडील अधिकचे, समाजामध्ये वाटून टाकण्यासाठी तयार असलेले, समाजाच्या प्रती सहानुभाव बाळगणारे व समाजाचे ऋण फेडण्याची इच्छा असलेले निस्वार्थी नागरिक या चळवळीशी जोडले गेले आहेत.

 

17.  भारतीय संस्कृतीमध्ये दरिद्री-नारायणाच्या सेवेला सर्वोत्तम मानले गेले आहे. भगवान बुद्धानेही म्हटले आहे, ‘अभित्वरेत कल्याणे’ म्हणजेच कल्याणकारी कार्य नेहमीच तत्परतेने केले पाहिजे. मला विश्वास आहे की माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण आपल्या भारतीय समाजासाठी आणि देशाच्या कल्याणासाठी तत्परतेने योगदान देत राहू.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

18.  स्वातंत्र्य दिन हा नेहमीच विशेष असतो मात्र यावर्षी त्याला एक निराळेच औचित्य लाभले आहे. काही आठवड्यांतच, 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीचे वर्ष सुरू होत आहे. गांधीजींनी केवळ आपल्या स्वातंत्र्यचळवळीचे नेतृत्व केले नाही तर त्यांनी आपल्याला नैतिकतेचा मार्ग दाखवून दिला जो आजही आपल्याला उपयुक्त आहे.  भारताचा राष्ट्रपती या नात्याने मला जगभर फिरण्याची संधी मिळाली, विशेषत: दक्षिण आफ्रिकेतील काही देशांना मी भेट दिली. जगाच्या पाठीवर सर्वत्र, सर्व खंडांमध्ये मानवतेचे प्रतीक म्हणून गांधीजींचा सन्मानपूर्वक उल्लेख केला जातो, त्यांच्या स्मृती जतन केल्या जातात. भारताचे मूर्तरूप म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

19.  गांधीजींच्या विचारांची खोली समजून घेणे सोपे नाही. राजकारण आणि राजकीय चळवळ किंवा स्वातंत्र्यलढा याच्या मर्यादित व्याख्या त्यांना मान्य नव्हत्या. नीळीच्या शेतकर्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गांधीजी आणि कस्तुरबा जेव्हा बिहारमधील चंपारण्य भागात गेले तेव्हा आपला बराचसा वेळ त्यांनी तिथल्या स्थानिकांना विशेषत: महिला आणि मुलांना साक्षर करण्यासाठी, लोकांना स्वच्छता आणि आरोग्य यांची शिकवण देण्यासाठी दिला. चंपारण्यात किंवा इतरही अनेक प्रसंगी गांधीजींनी स्वत: स्वच्छता मोहिमांचे नेतृत्व केले. ‘स्वच्छता’ ही स्वयंशिस्तीसाठी तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे असे त्यांचे मत होते.

20.  त्यांचे हे वागणे पाहून त्या काळात अनेक जण बुचकळ्यात पडत असत. या सर्वांचा स्वातंत्र्याशी काय संबंध असा प्रश्न त्यांना पडे. गांधीजींसाठी मात्र हा मुद्दा म्हणजे साऱ्या चळवळीचा गाभा होता. हा लढा त्यांच्यामते केवळ राजकीय सत्तेसाठी नव्हता तर गरीबातील गरीब व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठीचा, अशिक्षितांना सुशिक्षित बनविण्यासाठीचा होता. प्रत्येक गाव, प्रत्येक समूदाय, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक व्यक्तीला एक सन्मानाचे आयुष्य जगता यावे याची हमी देणारा हा संघर्ष होता.

21.  गांधीजी स्वदेशीचा उल्लेख अनोख्या ऊर्मीने करायचे. भारतीय सर्जनशीलता आणि समंजसपणा यांना प्रोत्साहन देण्यासाठीचे ते एक अभिमानास्पद माध्यम आहे असे त्यांचे म्हणणे होते. असे असले तरीही बाहेरच्या जगामध्ये इतरत्र कोणकोणत्या विचारप्रवाहांचा प्रभाव आहे याचा ते सजगतेने अभ्यास करीत. एतद्देशीय विचार अधिक समृद्ध करण्यासाठी ते अशा विचारधारांचे स्वागतच करीत. त्यांच्यामते भारतीय संस्कृती ही कधीही बंदिस्त नव्हती तर नवनव्या विचारांसाठी तिची दारे सदैवच खुली होती व तेच तिचे वैशिष्ट्य आहे. स्वदेशीची त्यांची संकल्पनाही अशीच होती. आपल्या आर्थिक, आरोग्यविषयक, शैक्षणिक आणि सामाजिक आकांक्षांच्या पूर्ततांसाठी बाहेरच्या जगाशी संबंध प्रस्थापित करताना, किंवा धोरणे ठरवताना त्यांचे हे स्वदेशी विचार आजही लागू ठरतात.

22.  हिंसेमधील शक्तीपेक्षा अहिंसेतील ताकद ही केव्हाही अधिक असते हा गांधीजींनी दिलेला सर्वात मोठा मंत्र. हाताने प्रहार करण्यापेक्षा तो हात आवरण्यासाठी कितीतरी अधिक बळ लागते आणि हिंसेला समाजामध्ये जराही स्थान नाही असे त्यांनी सांगितले. अहिंसा हे गांधीजींनी आपल्याला दिलेले सर्वात प्रभावी शस्त्र आहे. त्यांच्या इतर शिकवणुकींप्रमाणेच या विचाराची मूळेही भारताच्या प्राचीन विद्वत्तेमध्ये खोलवर रुजलेली होती आणि आज 21 व्या शतकामध्येही आपल्या रोजच्या जगण्यातून त्याचा प्रभाव जाणवतो.

23.  गांधीजींच्या 150व्या जयंतीसोहळ्याच्या अगदी काहीच दिवस आधी आपला हा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. तेव्हा या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आपण त्यांनी दिलेले विचार आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न करू या. आपले स्वातंत्र्य साजरे करण्याचा याहून चांगला मार्ग असू शकत नाही तसेच भारतीयत्व साजरे करण्याचा याहून चांगला मार्ग असू शकत नाही.

24. आणि हे भारतीयत्व केवळ आपल्यापुरतेच मर्यादित नाही. आपला देश आणि आपली संस्कृती यांनी साऱ्या जगाला दिलेली ती देणगी  आहे. गांधीजींच्या विचारांच्या आणि आपल्या  भारतीय विचारसरणीच्याही गाभ्याशी ‘वसुधैव कुटुंबकम’ हे तत्व सदैव राहिले आहे. सारे जग म्हणजे एक कुटुंबच आहे असा त्याचा अर्थ आहे. या विचाराचा पाठपुरावा करण्यासाठीच आपण अनेक आफ्रिकी देशांना मदत पुरवित आहोत, हवामान बदलाच्या प्रश्नावर मात करण्यासाठीचे उपक्रम हाती घेत आहोत, जगभरात ठिकठिकाणी चाललेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये योगदान देत आहोत, नैसर्गिक आपत्तींच्या तडाख्यात सापडलेल्या शेजारी राष्ट्रांना मदत करत आहोत, संघर्षग्रस्त क्षेत्रात अडकलेल्या आपल्या देशबांधवांना तसेच इतर देशांच्या नागरिकांना सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. गांधीजींच्या व भारतीय परंपरेच्या विचारसरणीचा अवलंब करीतच आपण आरोग्यासाठी व स्वास्थ्यासाठी योगविद्येचा प्रसार करीत आहोत व विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. आपण गांधीजींचे वारस आहोत. आपला प्रवास एकट्याचा असतो, तेव्हाही आपण मनाशी जपलेले स्वप्न हे अखिल मानवतेच्या कल्याणाचेच असते.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

25.  देशभरातील अनेक विद्यापीठांतील विद्यार्थ्यांशी मी जेव्हा जेव्हा संवाद साधला आहे तेव्हा तेव्हा त्यांना अगदी चार-पाच दिवसांसाठी का होईना पण ग्रामीण भागात जाऊन राहण्याची विनंती केली आहे. ‘विद्यापीठीय सामाजिक बांधिलकी’ किंवा यू.एस. आर. उपक्रमाच्या रूपात हा प्रयोग करून पाहता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या देशाचे अंतरंग समजून घेता येईल. समाजकल्याण उपक्रम कसे चालतात हे जवळून पाहण्याची व त्यात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळेल. हे उपक्रम ग्रामीण जीवनावर कशाप्रकारे प्रभाव टाकत आहेत हे समजून घेता येईल. यातून विद्यार्थ्यांचा आणि त्याचबरोबर गावांचाही फायदा होईल व पर्यायाने देशाचेही हित साधले जाईल. यातून आपल्या मनात स्वातंत्र्यचळवळीच्या वेळेसारखीच जाज्वल्य देशप्रेमाची भावना जागी होईल व प्रत्येकाला राष्ट्रउभारणीच्या कामाशी जोडून घेण्याची प्रेरणा मिळेल.

26.  आपल्या तरुणाईच्या मनात तेवता आदर्शवाद आणि त्यांचा ध्यास पाहून माझे मन कृतार्थ होते. आपल्या स्वत:साठी, आपल्या कुटुंबासाठी, अधिक व्यापक पातळीवर समाजासाठी आणि आपल्या देशासाठी काहीतरी साध्य करून दाखवावे ही ऊर्मी त्यांच्याठायी आहे. नैतिक मूल्यांच्या शिकवणीचा याहून चांगला परिणाम असू शकत नाही. फक्त पदवी किंवा पदविका मिळविणे म्हणजे शिक्षण नव्हे तर इतरांच्या आयुष्यात शाश्वत सुधारणा घडवून आणण्याप्रती बांधिलकी मानणे हा शिक्षणाचा खरा अर्थ आहे. यातूनच सहानुभाव आणि बंधुभाव कृतीमध्ये परिवर्तीत होऊ शकेल. हाच भारतीय विचारसरणीचा आत्मा आहे. हाच भारत आहे. कारण भारत केवळ इथल्या सरकारचा नाही तर भारतीय जनतेचा आहे.

27.  एकजुटीने प्रयत्न केले तर आपण या देशातील प्रत्येक नागरिकाला मदत करू शकतो. एकजुटीने आपण आपल्या देशातील जंगले आणि नैसर्गिक वारसा जोपासू शकतो. आपली ऐतिहासिक मानचिन्हे पुढील पिढ्यांना दाखविण्यासाठी सुरक्षित ठेवू शकतो, आपल्या ग्रामीण आणि शहरी परिसरांना नवे रूप देऊ शकतो. एकजुटीने आपण गरीबी, निरक्षरता आणि असमानतेचे निर्मूलन करू शकतो. हे सारे आपण एकजुटीने करू शकतो आणि ते करायलाच हवे. सरकारची अर्थातच यात प्रमुख भूमिका आहे पण ती एकमेव भूमिका नाही. सरकारी योजना आणि प्रकल्प आपण आपल्या प्रयत्नांनी सुफल करू या. ‘हे सारे माझेच आहे’ हा विचारच आपल्याला प्रेरणा देत राहील.

28.  इतके बोलून मी पुन्हा एकदा या स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमचे आणि तुमच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो व  उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप सार्या शुभेच्छा देतो.

धन्यवाद

जय हिंद!