इंधनावरील वॅट कमी करा:शिवसेनेची मागणी

0
806
 गोवा खबर:दिवसेंदिवस वाढत असलेल्या इंधनाच्या दरामुळे सर्वसामान्य लोकांच जगण मुश्किल झाल्याने शिवसेनेने आज व्यावसायिक कर आयुक्त कार्यालयाबाहेर इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने केली. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयात हजर नसल्याने अतिरिक्त आयुक्त  गाडगीळ यांची भेट घेऊन इंधनावरील वॅट कमी करण्याची मागणी केली. 
यावेळी पत्रकारांशी बोलताना राज्य प्रमुख जितेश कामत म्हणाले, गोव्यात मोटर गाडी कींवा बाईक चैनीच्या वस्तू नसून अत्याआवश्यक साधन सुविधा आहे. गोव्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसुन ती सुलभ करण्यात अजुन पर्यंतची सर्व सरकारे अपयशी ठरली आहेत. इंधना वरील वॅट कमी करून  कमी पैशात लोकांना इंधन उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. डीलरना १८ ते १९ रूपये दराने इंधन उपलब्ध होत असूनही नागरीकांना 70 टक्के एक्साईज ड्युटी आणि २५ टक्के वॅट मिळुन ७७ ते८० रूपयाने इंधन विकत देणं म्हणजे २५ रुपयांच्या कोंबडीच्या मटणाला ७५ रूपयांचा  मसाला विकत घेण्यासारखे असल्याची टीका कामत यांनी केली आहे.
गरज नसताना जर माजी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वॅट कमी केला होता तर आता महामारी संकट काळात संवेदनशीलतेचे दर्शन घडवत मुख्यमंत्र्यांनी परीकरांचा वारसा जपावा असे मत कामत यांनी व्यक्त केले आहे.
 सरचिटणीस मिलिंद गावस यांनी  गोव्यात सध्या पर्यटन व्यवसाय आणि मायनींग बंद असुन लोकांकडे पैसे नाहीत त्यात डीझेल दर वाढिमुळे सर्व वस्तू महाग होऊन लोकांवर अतिरिक्त भार पडणार असल्याची खंत व्यक्त केली. शिवसेना दरवाढीचा निषेध करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. आजपासून पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी रेस्टॉरंट आणि हाॅटेल वरील टाळेबंदी उठवण्यात आली तरी निगडित टॅक्सी आणि इतर दर वाढीमुळे पर्यटन क्षेत्रावर विपरीत परिणाम होणार असल्याचे गावस यांनी मत व्यक्त केले.
 प्रामुख्याने राज्य मतदाता सर्वेक्षण समन्वयक झायगल लोबो, सचिव वंदना चव्हाण, उत्तर जिल्हा प्रमुख सुशांत पावसकर, उत्तर जिल्हा सरचिटणीस नंदा भाईडकर, मेहबूब नालबान, रविंद्र दावणे आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते.